fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-3 ने पिछाडीवर आहे.

त्यामुळे आता मालिका गमावल्यानंतर निदान हा सामना जिंकून समाधानाने भारतात परतण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल तर इंग्लंडचा संघ अॅलिस्टर कूकला शेवटच्या सामन्यात विजयी निरोप देण्याचा प्रयत्न करेल.

हा सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. त्याने सोमवारी (3 सप्टेंबर) हा सामना झाल्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे.

तसेच शेवटच्या सामन्यात कूक काही खास विक्रमही करणार आहे. त्याबरोबरच या सामन्यात अन्य अनेक विक्रमही होण्याची शक्यता आहे.

असेच काही विक्रम, जे या सामन्यात होऊ शकतात- 

– कसोटीत जेम्स अॅंडसरनला सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज बनण्यासाठी 5 विकेट्सची गरज. त्याने 142 कसोटीत 559 विकेट्स घेतल्या आहेत. तर ग्लेन मॅकॅग्राने 124 कसोटीत 563 विकेट्स घेतल्या आहेत.

– अदिल रशीदला कसोटीत 50 विकेट्सचा टप्पा पार करण्याची संधी. त्याने 13 कसोटीत 45 विकेट्स घेतल्या आहेत.

– मोईन अलीला 150 कसोटी विकेट्स घेण्यासाठी 8 विकेट्सची गरज. त्याने 51 कसोटीत 142 विकेट्स घेतल्या आहेत.

– अॅलिस्टर कूकला भारताविरुद्ध 30 वा कसोटी सामना खेळण्याची संधी. तसेच त्याला भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम करण्याची संधी. जर तो या सामन्यात खेळला तर रिकी पाँटिंगचा भारताविरुद्ध 29 कसोटी सामने खेळण्याच्या विक्रमाला मागे टाकेल.

– अजिंक्य रहाणेचा हा कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना. असा पराक्रम करणारा तो 32 वा भारतीय खेळाडू ठरेल.

– अॅलिस्टर कूकला केनिंग्टन ओव्हल मैदानावर 1000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी 1 धावेची गरज. याआधी या मैदानावर हा पराक्रम लेन हटन(1521) आणि ग्रॅहम गुच(1097) यांनी केला आहे. कूकने या मैदानावर 12 कसोटी सामन्यात 999 धावा केल्या आहेत.

– केनिंग्टन ओव्हल मैदानावर सर्वाधिक 13 कसोटी सामने खेळण्याच्या डेनिस कॉम्पटन यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची कूकला संधी.

– आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा पुर्ण करणारा जगातील 15वा फलंदाज बनण्यासाठी विराटला केवळ 21 धावांची गरज. त्याने 343 सामन्यात 17979 धावा केल्या आहेत.

– कसोटीत विराटने 70 सामन्यात 23 शतके केली आहेत. त्याला आता 23 शतकांचा स्टीव स्मिथ, विरेंद्र सेहवाग, केविन पीटरसन, जस्टीन लॅंगर आणि जावेद मियाॅंदाद यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

– इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्यासाठी विराटला केवळ 58 धावांची गरज. राहुल द्रविडने एकाच मालिकेत इंग्लंडमध्ये 602 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटला द्रविडचा हा विक्रम मोडण्याची संधी.

– अॅलिस्टर कूकचा हा सलग 159 वा कसोटी सामना. तो सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारा फलंदाज आहे.

– भारताने जर हा सामना जिंकला तर 22 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच एका कसोटी मालिकेत 2 सामने जिंकण्याचा पराक्रम करेल. याआधी 1986 ला भारत इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत 2 सामने जिंकले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…

आज करु शकतो १८ वर्षीय पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून पदार्पण

You might also like