मुंबई । ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर आणि सॅम करन यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसर्या वनडेत विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 24 धावांच्या फरकाने पराभूत केले. या विजयामध्ये इंग्लंडच्या तिन्ही गोलंदाजांनी 3-3 विकेट्स घेतल्या. त्याच वेळी आदिल रशीदला एक यश मिळाले.
रविवारी (13 सप्टेंबर) मँचेस्टर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड फार मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून केवळ 231 धावा करू शकला, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी मोठी कामगिरी बजावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हे छोटासे आव्हान पार करता आले नाही. आणि संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 207 धावांवर गुंडाळला गेला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सामनावीर ठरला.
इंग्लिश गोलंदाजांपुढे फक्त ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच आणि मार्नस लब्युशेन पुढे उभे राहू शकले. फिंचने सर्वाधिक 73 आणि लब्यूशेनने 48 धावा केल्या. त्याचवेळी अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. या तिघांशिवाय ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाने 11 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. ऑस्ट्रेलियन संघाने पहिला वनडे सामना 19 धावांनी जिंकला, परंतु दुसर्या वनडेमध्ये संघ लयीत कुठेच दिसला नव्हता.
इंग्लंडची सुरुवात खराब
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात झाल्यानंतर इंग्लिश संघाची सुरुवातही खराब झाली. सातव्या षटकात त्याचे दोन्ही सलामीवीर जॉनी बेअरस्टो (0) आणि जेसन रॉय (21) पॅव्हिलीयनमध्ये परतले होते.
झम्पाने, अनुभवी जो रूट (39), कर्णधार ओएन मॉर्गन (42) आणि पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावणारा सॅम बिलिंग्ज (8) यांना बाद करून, इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांना टिकू दिले नाही. झम्पाने 36 धावांत 3 गडी बाद केले.
तळातील फलंदाज ख्रिस वॉक्स (26), टॉम करन (37) आणि आदिल रशीद (नाबाद 35) यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या उभा करून दिली. करन आणि रशीदने 9 व्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली आणि संघाला 231 धावांवर पोहोचण्यास मदत केली.