क्रिकेटजगतात थोड्याफार दिवसांनी सातत्याने एक चर्चा चालू असते ती म्हणजे फॅब फोरची. फॅब फोर म्हणजे सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट चार फलंदाज. भारताचा विराट कोहली, इंग्लंडचा जो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ व न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांचा या फॅब फोरमध्ये समावेश आहे. आकडेवारी, त्यांचे आपल्या संघाच्या विजयातील योगदान, प्रतिस्पर्ध्यांच्या मनातील धास्ती आणि फॅन फॉलोविंग या साऱ्या गोष्टींचा विचार यात केला जातो. हे चारही जण पुरुष क्रिकेटचे फॅब फोर असले तरी, तुम्ही कधी विचार केला आहे का की, महिला क्रिकेटच्या फॅब फोर कोण असतील. आजच्या या लेखामध्ये आपण त्याच महिला क्रिकेटमधील फॅब फोरविषयी जाणून घेणार आहोत.
महिला क्रिकेटमधील फॅब फोरचा विचार केल्यास टीम इंडियाकडून जे नाव वुमेन्स फॅब फोरमध्ये समाविष्ट असेल ते म्हणजे टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana). सध्या फॅन फॉलोविंगच्या बाबतीत स्मृती जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर दिसून येते. केवळ 25 वर्षाची असलेली स्मृती मागील 9 वर्षांपासून टीम इंडियाचा भाग आहे. यादरम्यान तिने जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटर्समध्ये स्वतःचे नाव समाविष्ट केले. ती तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी योगदान देत आली आहे. 2017 मध्ये महिला संघाला वनडे वर्ल्डकप फायनलपर्यंत घेऊन जाण्यात तिचा सिंहाचा वाटा होता. ती दोन वेळा आयसीसी वुमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर ठरली आहे. जगभरातील विविध फ्रॅंचायजी लीगमध्ये खेळत असल्याने त्या सर्व देशांमध्ये तिची प्रसिद्धी देखील भरपूर आहे.
ज्याप्रकारे पुरुष क्रिकेटमध्ये फॅब फोरचा कोटा स्टीव्ह स्मिथ पूर्ण करतो, त्याचप्रकारे महिला क्रिकेटमध्ये ही जागा मेग लॅनिंग (Meg Lanning) आपल्या नावे करते. ऑस्ट्रेलियन संघात बेथ मुनी आणि एलिसा हिली या तितक्याच दर्जेदार खेळाडू असताना मेगने आपली वेगळी छाप सापडली. ती सध्या ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार आहे. तिच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2020 टी20 वर्ल्डकप व 2022 वनडे वर्ल्डकप आपल्या नावे केला. तीस वर्षांची मेग 2010 पासून ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करतेय. तिची वनडे सरासरी 53 पेक्षा जास्त आहे. वनडेत साडेचार हजार आणि टी20 मध्ये तीन हजार रन्स करणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये तिचा समावेश होतो.
ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघा इतकाच तिसरा मजबूत महिला संघ म्हणजे इंग्लंड. या संघातही अनेक सुपरस्टार महिला खेळाडूंचा समावेश आहे. वुमेन्स फॅब फोरमध्ये या संघातील कोणाचा समावेश होत असेल तर ती म्हणजे हीदर नाईट (Heather Knight). इंग्लंड संघाची कर्णधार असलेली नाईट बारा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतेय. इंग्लंड संघात सध्या तिच्यासोबतच नताली सिवर, टॅमी ब्युमाँट आणि ऍमी जोन्स या तितक्याच प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र, नाईटचा संघातील प्रभाव काहीसा अधिक आहे. चार्लेट एडवर्ड्सनंतर तीने इंग्लंड संघाचे यशस्वी नेतृत्व करत 2017 वनडे वर्ल्डकप संघाला जिंकून दिला. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या नाईटने साडेपाच हजार रन्स बनवले आहेत.
सध्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट मधील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून तिचे नाव घेतले जाते ती म्हणजे न्यूझीलंडची सुझी बेट्स (Suzie Bates). ती 2006 पासून न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करत आहे. न्यूझीलंड महिला क्रिकेटच्या भरभराटीमध्ये सोफी डिव्हाईनसह तिचा सिंहाचा वाटा मानला जातो. दोन वेळा आयसीसी वुमन्स वनडे क्रिकेटर ऑफ द इयर व प्रत्येकी एकदा आयसीसी वुमेन्स टी20 क्रिकेटर ऑफ द इयर तसेच विस्डेन वुमेन्स क्रिकेटर ऑफ द क्रिकेटर पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. बरेच वर्ष न्यूझीलंड नॅशनल टीमचे देखील तिने नेतृत्व केले. तिच्या नावे सध्या 8 हजारपेक्षा जास्त रन्स जमा आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कपिल पाजींच्या खिलाडूवृत्तीमुळे टीम इंडियाला पत्करावा लागलेला पराभव, पण जगभरात झालेलं कौतुक
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत