कसोटी क्रिकेट म्हणजे खरे क्रिकेट !
असे कितीतरी माजी खेळाडू व समीक्षक ठासून सांगत असतात. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंची एकाग्रता, समर्पण, कौशल्य, मानसिक व शारीरिक क्षमता या सर्वांचा कस लागतो म्हणून कसोटी क्रिकेट सर्वात्तम आहे, असे या लोकांचे म्हणणे. आजही बॅटिंग करताना, जो बॅटर पिचवर नांगर टाकून उभा राहतो, त्या बॅटर्सचा चाहतावर्ग काही औरच असतो.
भारतीय क्रिकेट बाबतीत सांगायचे झाले, तर सुनील गावसकर, राहुल द्रविड व चेतेश्वर पुजारा अशी काही नावे समोर येतात, जे विरोधी संघांला अक्षरशः रडकुंडीला आणत. आपल्या सॉलिड डिफेन्सने हे बॅटर्स दिवस-दिवस पिचवर उभे राहत. यातील द्रविडला तर द ग्रेट ‘वॉल ऑफ इंडिया’ म्हटलं जातं. परंतु द्रविडच्या आधीच्या पिढीत असे एक बॅटर होऊन गेले ज्यांना सर्वात आधी ‘द ग्रेट वॉल’ म्हटले गेलेले. त्यांना सुनील गावसकरांचा राईट हँडही म्हणलं जायचं. ते अंशुमन गायकवाड होते.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले दत्ताजीराव गायकवाड यांचे ते सुपुत्र. वडिलांप्रमाणेच आधी बडोदा आणि नंतर टीम इंडियापर्यंत त्यांचा प्रवास झाला. त्यांच्याकडे ना कलात्मकता होती ना तितका फिटनेस होता. त्यांच्याकडे होतं फक्त टेम्परामेंट. कोणत्याही परिस्थितीत ते रन्स काढण्यात वाकबगार होते. डोमेस्टिक क्रिकेट गाजवून 1974 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध त्यांनी टेस्ट डेब्यू केला. सुनील गावसकरांसोबत ते ओपनिंगला येऊ लागले. अशात पुढच्याच वर्षी टीम इंडिया वेस्ट इंडीज टूरवर गेली.
चार टेस्टच्या त्या सिरीजमधील पहिल्या तीन टेस्टनंतर सीरिज 1-1ने बरोबरीत होती. डॅनियल, फ्रेडरिक्स, जुलियन आणि मायकल होल्डिंग यांच्या बीमर्स आणि बाऊंसर्सचा सामना करत गावसकर व गायकवाड यांनी 136 रन्सची ओपनिंग दिली. ही तीच इनिंग होती जेव्हा गावसकर म्हणालेले, “मी इथे मरण्यासाठी नाही आलो” तेव्हा गायकवाड यांनीच त्यांना समजावलेले. गावसकर आऊट झाले आणि त्यानंतर गायकवाड यांच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवला. खरंतर गायकवाड यांच्या डिफेन्सने मायकल होल्डिंग अक्षरशहा हैराण झालेले. आपण जीव तोडून बॉलिंग करतोय आणि हा विकेट देत नाही म्हणून त्यांचा संयम संपत आलेला. अशात एका बॉलने गायकवाड यांच्या बोटावर आघात केला. होल्डिंग जवळ येतात गायकवाड काहीतरी पुटपुटले. आपल्याच देशात येऊन आपल्याला नडतोय म्हटल्यावर होल्डिंग यांचा इगो हर्ट झाला. पुढचा बॉल त्यापेक्षा जास्त स्पीडने आला आणि थेट गायकवाड यांच्या कानामागे लागला. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. 48 तास आयसीयू मध्ये राहिल्यानंतर त्यांना शुद्ध आली. जीव जाता जाता वाचला. मात्र, तो आघात इतका जोरात होता की तेव्हापासून त्यांच्या डाव्या कानाने कमी ऐकू येऊ लागलं. जो बाऊन्सर जीवावर बेतला होता, तो बाउन्सर काही वर्षांनी बॅन करण्याची मागणी उठली. मात्र या मागणीला विरोध करणारे पहिले क्रिकेटर स्वतः अंशुमन गायकवाड होते.
गायकवाड यांच्या करिअरमधील दुसरी हायलाईट म्हणजे पाकिस्तानविरुद्धची ती मॅरेथॉन डबल सेंचुरी. 1983साली कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध तब्बल 671 मिनिटे बॅटिंग करून 201 रन्स बनवले. हा एक भारतीय रेकॉर्डच बनला. आपलं द ग्रेट वॉल हे नाव त्यांनी या इनिंगमध्ये सार्थ करूनच दाखवलं. 1984 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी टेस्टला रामराम केला. ज्या ईडन गार्डनवर त्यांनी टेस्ट क्रिकेटला शुभारंभ केलेला त्याच ईडन गार्डनवर त्यांनी आपली शेवटची टेस्ट खेळली. आणखी तीन वर्षे खेळत त्यांनी वनडे क्रिकेटमधूनही रिटायर होत खेळाडू म्हणून आपलं करिअर संपवलं. पुढे नॅशनल सिलेक्टर आणि पहिले भारतीय हेडकोच म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. आजही भारतीय क्रिकेटमध्ये घडलेल्या कोणत्याही गोष्टीवर निर्भयपणे सर्वात पहिल्यांदा प्रतिक्रिया येते ती अंशुमन गायकवाड यांचीच!
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या गोलंदाजीला सोन्याचे दिवस आणू शकणारे 5 धुरंधर, 2022मध्ये केलंय संघात पदार्पण
पहिली ओव्हर, पहिली विकेट, पहिली धाव अन् पहिला षटकार, वाचा WPLमधील खेळाडूंची पहिली-वहिली कामगिरी