जगातील प्रत्येक व्यक्तीला भावना असतात. पण काहीजण त्या व्यक्त करु शकतात तर काहीजण नाही. प्रत्येकाची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते, जिथे व्यक्तीला धैर्याने सामोरे जावे लागते. खेळाडूंसमोरही अशा परिस्थिती येतात जिथे त्यांना खंबीर राहावे लागते लागते.
नुकतेच भारतीय क्रिकेट संघातील मोहम्मद सिराज हा याचे उहाहरण आहे. तो भारतीय संघासह ऑस्ट्रेलियात असताना त्याच्या वडीलांचे दिर्घ आजाराने निधन झाले. यावेळी त्याने घरी परत न जाता ऑस्ट्रेलियातच रहाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला त्याच्या वडीलांचे अखेरचे दर्शनही घेता येणार नाही. पण या परिस्थितीत त्याने स्वत:ला सांभाळत देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिले.
त्याने म्हटले की “माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी देशाचे नाव उज्ज्वल करावे आणि मी ते नक्कीच करेन. माझ्या पाठीशी नेहमी उभा असलेला एक भक्कम आधार मी आज गमावला. हा एक अतिशय दुःखदायक क्षण आहे. मला देशाकडून खेळताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न होते.”
याआधीही भारतीय क्रिकेटपटूंनी अशा प्रकारचे धैर्य दाखवले आहे. या लेखातही अशा काही क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ ज्यांनी त्यांच्या वडीलांचे निधन झाल्यानंतरही क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिले.
1. विराट कोहली
2006 मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्याने विराटचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. त्यावेळी 18 डिसेंबर 2006 ला दिल्ली विरुद्ध कर्नाटक संघात सामना खेळला जात होता. त्यावेळी कर्नाटकने पहिल्या डावात 446 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करताना दिल्ली संघाने 100 धावांच्या आत 5 खेळाडू गमावले होते.
त्यामुळे फॉलोऑन टाळण्याची जबाबदारी 18 वर्षाच्या विराटवर होती. विराट सोबत संघाचा यष्टीरक्षक पुनीत बिष्ट फलंदाजी करत होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटने आपली विकेट टिकवून ठेवली आणि 40 धावांवर नाबाद राहिला. पण दिल्लीला फॉलोऑन पासून वाचवण्यासाठी बराच लांबचा प्रवास करायचा होता. पण त्याच रात्री विराटचे 54 वर्षीय वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले. पण असे असतानाही वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्याऐवजी विराटने दुसऱ्या दिवशी मैदानात जाऊन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
विराटने अशा परिस्थितीत परिपक्वता दाखवत त्यादिवशी 90 धावांची खेळी केली आणि दिल्लीला फॉलोऑन मिळण्यापासून वाचवले. विराटने ज्या परिस्थित येऊन ही कामगिरी केली होती, ते पाहुन विराटचे कौतुक झाले होते. तसेच विराटची क्रिकेटसाठी असणारी जिद्द आणि चिकाटी सर्वांना यामुळे पहायला मिळाली होती.
2. सचिन तेंडुलकर –
1999 चा विश्वचषक इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या विश्वचषकाची सुरुवात भारतासाठी खास झाली नव्हती. पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर भारताचा पुढचा सामना झिम्बाम्वे विरुद्ध होणार होता.
पण त्या सामन्याच्या आधी भारताचा प्रमुख फलंदाज असलेल्या सचिनला त्याच्या वडीलांच्या निधनाची वाईट बातमी मिळाली. त्यामुळे तो लगेचच वडीलांच्या अंत्यविधीसाठी भारतात परतला. त्यामुळे भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सचिन शिवाय खेळावा लागला होता. त्या सामन्यातही भारताला केवळ 3 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
त्यामुळे भारतीय संघासाठी पुढील केनिया विरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यातच सचिन भारतात होता. पण सचिनने विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला. सचिन केनिया विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघात सामील झाला. त्या सामन्यात त्याने केवळ 84 चेंडूत शतकाला गवसणी घातली होती. हे त्याचे 22 वे वनडे शतक होते. जेव्हा त्याने त्याचे शतक पूर्ण केले त्यावेळी त्याने आकाशाकडे पाहत बॅट उंचावली होती आणि त्याच्या वडीलांना आदरांजलीही वाहिली होती.
3. मनदीप सिंग –
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2020 च्या हंगामादरम्यान किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा फलंदाज मनदीप सिंगलाही पितृशोक झाला. पण यंदाचा हंगाम युएईमध्ये झाला असल्याने त्याला भारतात जाऊन परत सामने खेळण्यासाठी येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने युएईमध्येच थांबून क्रिकेट खेळण्याचा कठोर निर्णय घेतला होता.
मनदीपने वडीलांच्या निधनानंतर काही दिवसातच कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 55 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान जेव्हा त्याने अर्धशतक पूर्ण केले तेव्हा त्याने आकाशाकडे पाहिले आणि हा डाव वडिलांना समर्पित केला.
4. रिषभ पंत –
2017 चे वर्ष रिषभ पंतसाठी कडू-गोड आठवणींसारखे होते. त्याला आयपीएल लिलावामध्ये मोठी किंमत मिळाली होती. एवढेच नाही तर त्याला भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचीही संधी मिळाली होती. पण 2017 च्या आयपीएलदरम्यान त्याला वडिलांच्या निधानाची बातमी कळाली. त्याच्या वडीलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
त्यावेळी तो लेगचचे घरी अंत्यविधीसाठी गेला. पण त्यानंतर 2 दिवसातच तो पुन्हा दिल्ली संघात परतला. त्यावेळी 20 वर्षांच्या असलेल्या रिषभने घेतलेला निर्णय पाहून अनेकांना त्याचे कौतुक वाटले होते. त्याने वडीलांच्या निधनाच्या 2 दिवसानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध 33 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
बुम बुम इझ बॅक! ४० वर्षीय आफ्रिदी पुन्हा बनला कर्णधार
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बाऊचरचा खुलासा, ‘मला कोरोना झाल्याची कल्पनाच नव्हती’
‘…म्हणून, सूर्यकुमारला भारतीय संघात जागा नाही’, निवडकर्त्याचा मोठा खुलासा