मुंबई । भारताचा सुमित नागल प्रज्ञेश गुनेश्वरनसोबत अगामी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या तिस-या सत्राच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. इतिहासात पहिल्यांदाच दोन भारतीयांना दक्षिण आशियातील एकमात्र एटीपी टूर स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. ही स्पर्धा 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे.
नागलचा समावेश सुरुवातीला पर्यायी यादीत समावेश होता. त्यामुळे त्याचे मुख्य फेरीत प्रवेश करण्याचे लक्ष्य होते.त्यापुर्वी, भारताचा अव्वल मानांकित खेळाडू प्रज्ञेशला पोलंडच्या कामिल माजचरझकने माघार घेतल्याने मुख्य फेरीत स्थान मिळाले.प्रज्ञेश व नागल यांच्या मुख्य फेरीतील प्रवेशानंतर डेविस कपमध्ये सहभाग नोंदवलेला आणि दक्षिण आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रामकुमार रामनाथनला वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला.
कुपरेज येथील महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) येथे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, खजिनदार संजय खंदारे आणि एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत याची घोषणा करण्यात आली.
तीन वाईल्डकार्ड्स मधील पहिले वाईल्डकार्ड भारताचा तिसरा मानांकित रामनाथनला देण्यात आले. त्याच्या येण्याने भारतातील अव्वल तीन मानांकित खेळाडू स्पर्धेत आल्याने एकेरीच्या मुख्य फेरीत भारतीय संघ मजबूत भासत आहे.
वाईल्डकार्ड रामनाथनला देताना आम्हाला आनंद होत आहे. मुख्य फेरीत स्थान मिळाल्याने तो नक्कीच या स्पर्धेत चमक दाखवेल. आता भारताचे आघाडीचे तीन खेळाडू (प्रज्ञेश, नागल आणि रामनाथन) स्पर्धेत आल्याने भारतीय संघ आव्हान देण्यास सज्ज आहे. असे टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले.
दोन भारतीय खेळाडूंना मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्याने आनंद आहे. जगातील आघाडीच्या टेनिस खेळाडूंविरुद्ध ते चांगली कामगिरी करतील याची खात्री मला आहे. भारतीय खेळाडूंना पुणे येथील चाहत्यांचा पाठींबा देखील मिळणार आहे. भारतीय खेळाडूंना फायदा मिळावा या उद्देशानेच आम्ही या स्पर्धेचे आयोजन करत आहोत असे ते पुढे म्हणाले.
22 वर्षीय नागल सध्या जागतिक क्रमवारीत 131 व्या स्थानी आहे. गेल्या काही काळात त्याने चमक दाखवली आहे. अमेरिकन ओपन 2019 च्या पहिल्या फेरीत त्याचा सामना दिग्गज खेळाडू रॉजर फेडररशी झाला होता. त्याचे ग्रँडस्लॅम पदार्पण होते.
या सामन्यात त्याला पराभूत व्हावे लागले.चेन्नईचा खेळाडू रामनाथनने 2017 साली त्यावेळचा जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या डॉमनिक थिएमला सरळ सेटमध्ये नमविले होते व त्यामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले. तो पुणे येथील स्पर्धेत तिस-यांदा सहभाग नोंदवत आहे.
टाटा ओपन महाराष्ट्रच्या तिस-या सत्रात रामनाथन परत आल्याने आम्ही आनंदी आहोत.त्याने गेल्या दोन सत्रात चांगली कामगिरी करुन देखील त्याला पुढे जाता आले नाही. यावेळी भारतीय खेळाडू आपले आव्हान उपस्थित करतील असे टाटा ओपन महाराष्ट्रचे खजिनदार संजय खंदारे म्हणाले.
भारताच्या आघाडीच्या स्पर्धेपैकी एक असलेल्या या स्पर्धेच्या तिस-या सत्रात बेनोईट पेईराएंड, इवो कार्लोविक यांमध्ये जेतेपदाची चुरस पहायला मिळेल. स्पर्धेची पात्रता फेरी ही 1 आणि 2 फेब्रुवारीला खेळविण्यात येईल.
एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा म्हणाले की,या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना जगातील आघाडीच्या खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळतो. गेल्या काही सत्रात अनेक युवा भारतीय खेळाडू समोर आले आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना जागतिक स्तरावर चमक दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे.
स्पर्धेच्या तिकिट अधिकृत संकेतस्थळ https://www.zoonga.com/tata-open यावर उपलब्ध आहे.