येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 ला सुरुवात होणार आहे. यासाठी अनेक खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. आयपीएलपूर्वी अनेक खेळाडू फॉर्ममध्ये परतत आहेत. या यादीत आता अफगाणिस्तानचा दिग्गज गोलंदाज राशिद खानचाही समावेश झाला. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत राशिद खान अप्रतिम कामगिरी करतोय. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या राशिद खानचा हा फॉर्म इतर संघांसाठी धोक्याची घंटा आहे.
राशिद खाननं आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांत केवळ 14 धावा देऊन एकूण 4 बळी घेतले. हॅट्ट्रिक हुकली असली तरी त्याची गोलंदाजी अप्रतिम होती. त्यानं घेतलेली पहिली विकेट यष्टिरक्षक लॉर्कन टकरची होती. यानंतर राशिदनं हॅरी टॅक्टर, जॉर्ज टॉकरेल आणि मार्क अडायरच्या विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्ताननं हा सामना 10 धावांनी जिंकला.
राशिद खानच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकूण 109 सामने खेळले. या कालावधीत त्यानं एकूण 139 विकेट घेतल्या आहेत. 2022 मध्ये गुजरात टायटन्सनं त्याला महागडी रक्कम देऊन आपल्या संघात समाविष्ट केलं होतं. तेव्हापासून तो संघासाठी सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. गुजरातमध्ये जाण्यापूर्वी तो सनरायजर्स हैदराबादच्या टीमचा भाग होता.
राशिद खान गोलंदाजीबरोबरच गरज पडली तर वेगवान फलंदाजीही करू शकतो. त्यानं आयपीएलमध्ये काही सामने केवळ आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिले आहेत. त्यामुळे संघातील त्याचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे.
गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ – शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, राशिद खान, जोश लिटल, मोहित शर्मा, स्पेन्सन जॉन्सन, शाहरुख खान, उमेश यादव, रॉबिन मिन्ज, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, अजमतुल्ला ओमरझाई, मानव सुतार.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू भारतात दाखल, तब्बल 9 वर्षांनी करतोय पुनरागमन!
आयर्लंडच्या फलंदाजाचा टी20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम, ‘असं’ करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू