पुणे : रमणबाग माजी विद्यार्थी फुटबॉल संघ यांच्या वतीने व पीडीएफएच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या स्वर्गीय धनंजय भिडे सेव्हन-अ-साईड फुटबॉल चषक स्पर्धेत गतविजेत्या गनर्स एफसी संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद संपादन केले.
शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत गनर्स एफसी संघाने रुपाली स्पोर्ट्स क्लब संघाचा टायब्रेकरमध्ये ३-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. चुरशीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध खेळ केला. त्यामूळे पूर्वार्धात गोलशून्यबरोबरी कायम होती. उत्तरार्धात गनर्स एफसीच्या सूरज कदम, हर्षल वाळवेकर या आघाडीच्या फळीने जोरदार आक्रमण केले, पण त्यात त्यांना यश आले नाही. निर्धारित वेळेत सामना गोल शुन्य बरोबरीत सुटल्यामुळे पंचांनी टायब्रेकर पद्धतीचा अवलंब केला. टायब्रेकरमध्ये गनर्स एफसीकडून जयंत निंबाळकर, आयुज कुटे, केदार मुलमंडकर यांनी गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, रुपाली स्पोर्टस क्लबकडून अनिकेत कंद याला गोल मारण्यात अपयश आले.
याआधीच्या उपांत्य फेरीत पहिल्या लढतीत गनर्स एफसी संघाने संगम यंग बॉईज संघाचा २-१ असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. गनर्स एफसीकडून हर्षल वाळवेकर(४,७ मि,)याने दोन गोल तर, संगम यांग बॉईजकडून प्रतिक साबळे(२१मि.)याने एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात कृष्णा महनकाळे(२१मि.) याने नोंदवलेल्या एक गोलाच्या जोरावर रुपाली स्पोर्टस क्लब संघाने राहुल एफसी संघाचा १-० असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेतील विजेत्या गनर्स एफसी संघाला करंडक व १०००० रुपये, उपविजेत्या रुपाली स्पोर्ट्स क्लब संघाला ७००० रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, याशिवाय बेस्ट स्ट्रायकर्स आयुज कुटे(गनर्स फुटबॉल क्लब), बेस्ट गोलरक्षक अनुभव सरकार (रुपाली स्पोर्ट्स क्लब), बेस्ट मध्यरक्षक सुश्रुत घैसास(रुपाली स्पोर्ट्स क्लब) यांना प्रत्येकी १०००रुपये आणि करंडक प्रदान करण्यात आले. शिस्तबद्ध परशुरामीयन्स फुटबॉल क्लब संघाला करंडक देण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डीइएसच्या क्रीडा विभागाचे प्रमुख खेमराज रणपिसे, स्वप्नील देशमुख, बीएमसीसीचे उपमुख्याध्यापक आशिष पुराणिक, रमणबाग क्रीडा विभागाचे माधवी पांढारकर, महेश जोशी, रमेश शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश पोंक्षे, नितीन भुतकर, अभिजीत मेहेंदळे, भिडे सरांच्या पत्नी मीरा भिडे, मंगेश भिडे, साकेत भंडारे, भूषण मारटकर, रोहित रणधीर, स्वरुप माने,कौस्तुभ मोडक, गणेश जाधव, हर्षद सप्तर्षी, कौस्तुभ कुलकर्णी, धनराज गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
निकाल: उपांत्य फेरी:
गनर्स एफसी: २(हर्षल वाळवेकर ४,७ मि,)वि.वि.संगम यंग बॉईज: १(प्रतिक साबळे २१मि.);
रुपाली स्पोर्टस क्लब: १(कृष्णा महनकाळे २१मि.) वि.वि.राहुल एफसी:०;
अंतिम फेरी: गनर्स एफसी: ३(जयंत निंबाळकर, आयुज कुटे, केदार मुलमंडकर) टायब्रेकरमध्ये वि.वि.रुपाली स्पोर्टस क्लब:१(ऋतिक आहीर)(गोल चुकविला – अनिकेत कंद); पुर्ण वेळ: ०-०;