-आदित्य गुंड (Twitter- @adityagund)
तुझ्या एकदिवसीय पदार्पणावेळी मला क्रिकेट फारसं समजतही नव्हतं. कसोटीमध्ये मात्र तू आलास, तू पाहिलंस आणि तू जिंकलस! अशाच काहीशा थाटात तू पदार्पण केलंस. आयुष्यातला पहिला कसोटी सामना, तोही लॉर्ड्सवर आणि तू शतक काढलंस. याहून अधिक काय हवं असतं कोणाला? आजही लॉर्डसवर पदार्पणात शतक काढणाऱ्यांमध्ये सर्वाधिक धावांचा तुझा विक्रम अबाधित आहे. फलंदाजीच्या देवालाही जे जमलं नाही ते तू पहिल्याच कसोटीमध्ये करून दाखवलंस. एवढ्यावर न थांबता तू त्यानंतरच्या कसोटीत शतक काढून आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचं दाखवून दिलंस. आजही त्या दौऱ्यावरच्या मिशीवाल्या सौरव गांगुलीचं दोन्ही हात हवेत उंचावून केलेलं अभिवादन ठळकपणे आठवते.
टोरांटोमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तू १६ धावांत ५ बळी मिळवले तेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तुझा फोटो आला होता. तो फोटो माझ्या कात्रणवहीत बरीच वर्षे होता. इंग्लंडमध्ये द्रविडबरोबर श्रीलंकेचा तू केलेला बाजार आजही नजरेसमोरून हटत नाही. तुला ‘ऑफसाईडचा बादशाह’ म्हणत. मला मात्र तुझे क्रीजमधून पुढे सरसावत गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेले षटकार आजही आवडतात.आजही युट्युबवर ‘गांगुली सिक्सेस’ असा सर्च मारून येणारे व्हिडीओज मी बराच वेळ बघत बसतो.
भारतीय संघाचं कर्णधारपद म्हणजे एक काटेरी मुकुट. अगदी तरण्याबांड कोहलीच्या दाढीचे केसही हा मुकुट घातल्यावर काही दिवसांत पांढरे झाले. करोडो भारतीयांच्या अपेक्षांच्या ओझ्याने मढवलेला हा मुकुट तू मात्र लिलया पेललास (अर्थात तुझेही केस गेलेच.). तुझ्याअगोदरच्या कर्णधारांना जे जमले नाही ते तू करून दाखवलेस. भारतीय संघ परदेशातही जिंकू शकतो असा विश्वास तू संघामध्ये निर्माण केलास आणि परदेशात जिकूनही दाखवलंस. प्रतिस्पर्ध्याच्या ‘अरे’ला ‘का रे’ ने प्रत्त्युत्तर देण्याची वृत्ती तू भारतीय संघात निर्माण केलीस. तुझ्यावर अशा वागण्यामुळे टीकाही झाली. तू मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या संघाच्या कामगिरीकडे लक्ष देत राहिलास. स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियाचा विजयी वारू रोखणे, पाकिस्तानला पाकिस्तानात हरवणे ही सगळी कामगिरी तुझ्याच नेतृत्वाखाली भारताने करून दाखवली. आज दिग्गज म्हणून प्रसिद्ध झालेले हरभजन, सेहवाग, युवराज, झहीर, कैफ हे सगळे खेळाडू इतक्या वर्षांनंतरही तुझे ऋण जाणून आहेत. त्यांच्या उमेदीत त्यांची गुणवत्ता हेरून त्यांना तू पाठिंबा दिलास. असे करून तू स्वतः नुसताच हिरा नाहीस तर हिरे घडवणारा जवाहीरी आहेस हे तू सिद्ध केलेस.
लॉर्डसवर तू शर्ट काढून आनंद व्यक्त केला तेव्हा जगातील तमाम मिडीयाने तुझ्यावर टीका केली. भारतीय पाठीराख्यांना मात्र त्यात कुठेही वावगे वाटले नाही. काही दिवसांतच त्या घटनेला १६ वर्षे होतील. अगदी आजदेखील एकाही भारतीय पाठीराख्याला तुझी ही कृती चूक होती असे वाटत नाही याची मला खात्री आहे. त्यानंतर झालेल्या विश्वकरंडकात तुझ्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरी गाठली. आपण हरलो तरीही इथेच कुठेतरी आज दिसत असलेल्या बलाढ्य भारतीय संघाची पायाभरणी सुरु झाली असे अनेकजण आजही म्हणतात.
ऑस्ट्रेलियात आपली आणि संघाची कामगिरी चांगली व्हावी म्हणून मालिकेच्या आधी एकट्याने जाऊन तिथल्या मैदानांची रेकी करणारा बहुधा तू पहिलाच भारतीय खेळाडू असशील. याच रेकीदरम्यान तू चॅपेलच्या शैलीवर लुब्ध झालास आणि काही काळाने त्याला प्रशिक्षकपदाची गळ घातलीस. हे करून आपण स्वतःचीच कबर खोदतो आहोत याची कल्पनाही तुला नव्हती.
तुझा चॅपेल बरोबरचा वाद सगळीकडे जगजाहीर झाला. तू संघातले स्थानही गमावलेस. तरीही तू हारला नाहीस. तू झुंजत राहिलास. निवृत्तीचा विचार तर तुझ्या मनाला शिवलादेखील नाही. यादरम्यान तुझी एक जाहिरात आली होती. ‘मुझे भुले तो नही?’ असं विचारणाऱ्या दादाला पाहून तुझ्या पाठीराख्यांना तू पुनरागमन करणार अशी आशा वाटू लागली. मुळातच लढाऊ असलेल्या तूदेखील जोरदार पुनरागमन करत २००७ साली कसोटीत ११०० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२०० च्या आसपास धावा काढल्या. एव्हाना सुरु झालेल्या निवृत्तीच्या प्रश्नांना तूच विराम देत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण कारकिर्दीचा शेवट करू असे जाहीर केले.
शेवटच्या कसोटी मालिकेतही तू शतक काढले. अगदी शेवटच्या कसोटीत तू ८५ धावा काढत आपण अजूनही ‘दादा’ आहोत असे दाखवून दिले. दुसऱ्या डावात तू शून्यावर बाद झालास पण त्याचे कोणालाही शल्य वाटले नाही. तुझ्या पाठीराख्यांना पुन्हा एकदा तुझ्या कर्णधारपदाची झलक दिसावी म्हणून धोनीने काही षटके तुला कर्णधारपद दिले. धोनीचा मोठेपणा नक्कीच दाद देण्याजोगा होता. तुला शेवटचे एकदा क्ष्रेत्ररक्षण लावताना पाहून अनेकांचे मन हेलावले.
निवृत्तीनंतरही कॅबच्या माध्यमातून तू स्वतःला क्रिकेटशी जोडून ठेवले आहे. तुझ्या नेतृत्वाखाली कॅबला आणि ईडन गार्डन्सला सर्वोत्तम कामगिरी आणि सर्वोत्तम मैदानाचे पुरस्कारही मिळाले. तुला निवृत्त होऊन १० वर्षे झाली तरी आजही भारतीय क्रिकेट संघात ईर्षा निर्माण करणारा एक लढवय्या सेनापती म्हणून तुझंच नाव तोंडावर येतं. तू समालोचन करत असलास तरीही ‘काहीही म्हणा, गांगुली भारीच होता’ अशी वाक्ये कानावर पडतात. धोनीच्या कर्तृत्वावबद्दल शंका नसली तरी आज उभ्या असलेल्या या इमारतीचा खरा विशारद तूच होतास आणि राहशील हे कुणीही नाकारू शकत नाही. तुझी विजिगीषू वृत्ती, निडरपणा, आत्मविश्वास हा तुझ्यापुरताच न ठेवता संघापर्यंत पोहोचविणारा कर्णधार होतास तू. इथून पुढे अनेक कर्णधार येतील आणि जातील पण ‘दादा’ शेवटी ‘दादा’च राहील.भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ‘कर्णधारांचा कर्णधार’ म्हणून गांगुलीचे नाव घेतले जाईल यात तिळमात्र शंका नाही.
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर