महिला आशिया चषकाचा अंतिम सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) बांगलादेशमधील सिल्हेट येथे खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवत श्रीलंकेला 8 गडी राखून पराभूत करत सातव्यांदा आशिया चषकावर कब्जा केला. या सामन्यासाठी मैदानात उतरताच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली.
हरमनप्रीत कौर नाणेफेकीसाठी मैदानात दाखल झाली, तेव्हाच तिच्या नावे विश्वविक्रमाची नोंद झाली. हरमनप्रीत महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू बनली. हा तिचा 137 वा सामना होता. तिच्या आतापर्यंतच्या टी20 कारकिर्दीचा आढावा घेतल्यास तिने 2009 मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत भारतासाठी 123 डावात 27.48 च्या सरासरीने 2694 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 9 अर्धशतके ठोकलीत.
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आता न्यूझीलंडची सुझी बेट्स आहे. तिने आपल्या देशासाठी आतापर्यंत 136 सामने खेळलेत. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची डॅनी वॅट 135 सामन्यांसह विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाची अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिली व वेस्ट इंडिजची डिएंड्रा डॉटीन या अनुक्रमे 132 व 127 सामन्यांसह चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. हरमनप्रीतनंतर भारतासाठी स्मृती मंधानाने सर्वाधिक 102 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेत.
या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेचे फलंदाज आव्हान सादर करू शकले नाही. रेणुका ठाकूर, दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी श्रीलंकेचा डाव केवळ 65 धावांवर गुंडाळला. या धावांचा पाठलाग करताना भारताने शफाली वर्मा व जेमिमा रॉड्रिग्ज यांचे बळी गमावत विजयी लक्ष पूर्ण केले. रेणुका ठाकूर हिला सामनावीर तर, संपूर्ण स्पर्धेत शानदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्मा तिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार दिला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जरा इकडं पाहा! पाकिस्तानी पठ्ठ्यासोबत परदेशी चाहतीला करायचंय लग्न, क्रिकेटपटूवर लागलेत गंभीर आरोप
हे काय होतं! जेमिमाचे सेलिब्रेशन पाहून तुम्हीही असंच म्हणाल; भन्नाट व्हिडिओ व्हायरल