चेन्नई। शुक्रवारी (९ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा पहिला सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अखेरच्या चेंडूवर मुंबईने दिलेले १६० धावांचे आव्हान पूर्ण करत २ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बेंगलोरकडून गोलंदाजी करताना हर्षल पटेलने मोलाची कामगिरी केली. त्याने ५ विकेट्स घेत एक विक्रम केला आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षल चमकला
मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मापासून हार्दिक पंड्यापर्यंत अनेक आक्रमक फलंदाज आहेत. पण या आक्रमक फलंदाजीला बेंगलोरने १५९ धावांवर रोखण्यात यश मिळवले. यात मोलाचा वाटा राहिला तो ३० वर्षीय हर्षल पटेलचा. त्याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडलेल्या बेंगलोर संघाकडून १६ व्या षटकात हार्दिक पंड्याला १३ धावांवर आणि ईशान किशनला १८ व्या षटकात २८ धावांवर पायचीत केले.
त्यानंतर डावाच्या अखेरच्या षटकात त्याने ३ विकेट्स घेत जादूई कामगिरी केली. त्याने मुंबईच्या डावाच्या शेवटच्या षटकामधे कृणाल पंड्या(७), किरॉन पोलार्ड(७) आणि नवख्या मार्को जेन्सन(०) यांना बाद करत ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. त्याने एकूण त्याच्या ४ षटकांत २७ धावा देत या ५ विकेट्स घेतल्या.
त्यामुळे तो आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्स विरुद्ध ५ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. याआधी कोणालाही मुंबई इंडियन्सविरुद्ध ५ विकेट्स घेता आल्या नव्हत्या.
बेंगलोरने मिळवला विजय
बेंगलोरने मुंबईला १५९ धावांवर रोखले. त्यानंतर १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरलाही मुंबईच्या गोलंदाजांनी संघर्ष करायला लावला. मात्र, अखेरच्या काही षटकांत एबी डिविलियर्सने केलेल्या आक्रमक खेळीमुळे बेंगलोरने विजयाला गवसणी घातली. त्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी करत विजयाचा पाया रचला होता.
बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेलने ३९ आणि विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ एमएस धोनी आणि पोलार्ड यांचा समावेश असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता डिविलियर्सही सामील
बाबो! तब्बल १०७९ दिवसांनी मॅक्सवेलने मारला आयपीएलमध्ये षटकार, तोही चक्क १०० मीटरचा, पाहा व्हिडिओ