अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने दुसऱ्याच दिवशी १० विकेट्सने जिंकला. पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) झालेल्या या सामन्यात विजय मिळवत भारताने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाबरोबरच इंग्लंडचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहेत. पण असे असले तरी अजूनही भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे आव्हान कायम आहे.
भारत आणि इंग्लंड संघात होत असलेली मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. महत्त्वाचं म्हणजे या मालिकेनंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणते दोन संघ खेळणार हे निश्चित होणार आहे. न्यूझीलंड संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आधीच प्रवेशही केला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी केवळ १ जागा शिल्लक असल्याने चुरस वाढली आहे.
सध्या इंग्लंड पराभूत झाल्याने अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात ही स्पर्धा राहिली आहे.
सध्या भारत आणि इंग्लंड मालिकेतील तिसरा सामना जिंकल्याने भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ७१ टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळवला आहे. तर इंग्लंड संघ ६४.१ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ पाच मालिकांनंतर ११ सामन्यातील ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६९.२ टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
India top the table 👏
They now need to win or draw the last Test to book a place in the #WTC21 final 👀#INDvENG pic.twitter.com/FQcBTw6dj6
— ICC (@ICC) February 25, 2021
पण असे असले तरी भारत-इंग्लंड मालिका संपेपर्यंत तरी न्यूझीलंडबरोबर कोणता संघ अंतिम सामना खेळणार हे निश्चित होणार नाही. त्यामुळे या मालिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीची भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी काय समीकरणे आहेत ते पाहू.
…तर भारत पोहचेल अंतिम सामन्यात
भारताने जर इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका २-१ किंवा ३-१ अशा फरकाने जिंकली तर भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल होऊ शकतो. म्हणजेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने कमीत कमी २ सामने जिंकून विजय मिळवणे आवश्यक आहे. म्हणजेच सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताला उर्वरित एका सामन्यात पराभव टाळावाच लागणार आहे. भारत पुढचा सामना पराभूत झाला तर भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर होईल.
अशी ऑस्ट्रेलिया संघासाठी समीकरणे
ऑस्ट्रेलिया सध्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर जरी असला तरी त्यांनाही अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
जर भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवली तर ऑस्ट्रेलिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल. म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास त्यांची अपेक्षा असेल की एकतर ही मालिका बरोबरीतच सुटावी.
What does that result mean for #WTC21? 👀
India qualify if…
🇮🇳 2-1
🇮🇳 3-1Australia qualify if…
🤝 2-2England are eliminated.#INDvENG
— ICC (@ICC) February 25, 2021
लॉर्ड्सवर होणार अंतिम सामना
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ ऑगस्ट २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना यावर्षी जून महिन्यात लॉर्डस मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे न्यूझीलंडला अंतिम सामन्याचे तिकीट
ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी आपला दक्षिण आफ्रिकेचा नियोजित दौरा रद्द केला. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाची सद्य परिस्थिती बघता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच कारणाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत महत्वाचे बदल झाले.
न्यूझीलंडचा संघ पाच मालिकांनंतर ११ सामन्यातील ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड यानंतर कोणतीही मालिका खेळणार नाही आहे. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिवस-रात्र कसोटीत अक्षर पटेलने इंग्लंड संघाला दाखवले चांदणे, ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच गोलंदाज
विक्रमादित्य अश्विन! सगळ्यात जलद ४०० बळी घेणारा ठरला विश्वातील दुसरा गोलंदाज
आधी अश्विन आता अक्षर, १०० वर्षानंतर ‘असा’ पराक्रम करण्यात मिळालंय यश