कोणतीही मोठी क्रिकेट स्पर्धा जवळ येते, तेव्हा आजी-माजी क्रिकेटपटू स्पर्धा आणि सक्रिय खेळाडूंविषयी भविष्यवाणी करायला सुरुवात करतात. नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॅक कॅलिस याने आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जोस बटलर सर्वाधिक धावा करणार अशी भविष्यवाणी केली होती. यामध्ये आता भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे सेहवागने विराट कोहली याच्याविषयी नाही, तर रोहित शर्मा याच्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या मते, भारतीय परिस्थिती पाहता यावेळी विश्वचषकात रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. तसेच, तो संघासाठी बदल घडवून आणेल.
‘वीरू’ची भविष्यवाणी
‘वीरू’ नावाने ओळखळा जाणारा वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याला आशा आहे की, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत रोहित शर्मा (Rohit Sharma) शानदार फॉर्ममध्ये असेल. आयसीसीशी बोलताना तो म्हणाला की, सलामी फलंदाज विश्वचषकात भारतात सर्वाधिक धावा करतील. रोहित शर्माची बॅट यावेळी पुन्हा एकदा चमक दाखवेल. सेहवाग असेही म्हणाला की, जेव्हाही विश्वचषक येतो, तेव्हा रोहितच्या ऊर्जेचा स्तर आणि प्रदर्शन दोन्ही वाढते.
सेहवाग म्हणाला की, “मला वाटते की, बरेच सलामी फलंदाज आहेत. कारण, भारतातील खेळपट्टी चांगली आहे. त्यामुळे सलामी फलंदाजांना जास्त संधी मिळेल. मला वाटते की, जर मला एकाला निवडायचे असेल, तर तो रोहित शर्मा आहे. काही नाव आहेत, पण मला माहिती आहे की, मी भारतीय आहे आणि मला भारतीयालाच निवडावे लागेल, त्यामुळे रोहित शर्मा.”
https://www.instagram.com/reel/CwZKoezsK45/?utm_source=ig_embed&ig_rid=6183d900-85bf-4b12-9b7d-41a99cb7bef2
रोहितने 2019च्या विश्वचषकात पाडलेला धावांचा पाऊस
पुढे बोलताना सेहवाग म्हणाला की, “मी रोहित शर्माला निवडेल. कारण, जेव्हाही विश्वचषक येतो, तेव्हा त्याच्या ऊर्जेचा स्तर आणि त्याचे प्रदर्शन प्रचंड वाढते. त्यामुळे मला विश्वास आहे की, तो बदल घडवून आणेल आणि खूप जास्त धावा करेल.”
खरं तर, रोहितने 2019च्या विश्वचषकात अक्षरश: धावांचा पाऊस पाडला होता. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. रोहितच्या बॅटमधून एक-दोन आणि तीनही नव्हे, तर तब्बल 5 शतके निघाली होती. रोहितने 9 सामन्यात 81च्या सरासरीने 648 धावा केल्या आणि भारताला स्पर्धेच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. रोहितने यावर्षी क्रिकेट सर्व प्रकारात खेळल्या गेलेल्या 16 सामन्यात 48.57च्या सरासरीने 923 धावा केल्या आहेत. अशात विश्वचषकात रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. (icc world cup 2023 virender sehwag has tipped this cricketer to be the top run scorer)
हेही वाचा-
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! भारताच्या ‘या’ खेळाडूचे करिअर बर्बाद? 2 वर्षांपासून खेळला नाही सामना
जरा इकडे पाहा! भारताच्या माजी प्रशिक्षकाने वर्ल्डकपसाठी निवडला अंतिम संघ, ‘या’ 2 शिलेदारांना दिला डच्चू