उद्यापासून (12 मार्च) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या धरमशाला येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.
मात्र, ही मालिका सुरु होण्यापुर्वीच दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू एल्बी मॉर्केल यांनी भारताच्या विजयाची भविष्यवाणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ‘भारताला भारतातच पराभूत करणे विरुद्ध संघासाठी साधारणत: अशक्य असते.’
स्पोर्ट्स स्टारशी बोलताना मॉर्केल म्हणाला, “नवीन प्रशिक्षण स्टाफ दक्षिण आफ्रिका संघाला मिळण्यापुर्वी दक्षिण आफ्रिका संघासाठी उन्हाळी हंगाम चढउताराचा राहिला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी20 मालिका पराभूत झाल्यानंतर नुकतीच झालेली वनडे मालिका दक्षिण आफ्रिकेसाठी शानदार होती. तरी मला याबाबत काहीही बोलायचे नाही.”
“मात्र, जरी कोणताही संघ फॉर्ममध्ये असला तरी भारताला भारतात पराभूत करणे जवळपास अशक्य आहे. ही मालिका त्यांच्यासाठी कठीण असेल तरी मी अपेक्षा करतो की दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूतीने खेळेल. भारत ही मालिका 2-1ने जिंकू शकतो पण दक्षिण आफ्रिकेनेही त्यांच्याशी स्पर्धा करायला हवी. विशेषत: ऑस्ट्रेलियाला वनडेत पराभूत केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास वाढला असणार,” असेही ते यावेळी म्हणाले.
नुकत्याच मायदेशात पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 3-0ने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. तर, न्यूझीलंडविरुद्ध झालेली 3 सामन्यांची वनडे मालिका भारताने 3-0ने गमावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–कोरोनामुळे महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातून आयपीएलचे सामने ढकलणार पुढे?
–आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामन्यांनाही बसला कोरोनाचा जोरदार फटका!
–दक्षिण आफ्रिका ४ वर्षांनंतर भारत दौऱ्यावर; असा आहे भारत-द. आफ्रिका वनडे सामन्यांचा इतिहास