मोहाली कसोटी भारताने एक डाव आणि २२२ धावांनी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ विकेट्स गमावून ५७४ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांत आटोपला. भारताने श्रीलंका संघाला (IND vs SL) फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले. दुसऱ्या डावातही संघ फार काही करू शकला नाही आणि १७८ धावा करून सर्वबाद झाला. भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी १२ मार्चपासून खेळली जाणार आहे.
विराट कोहलीचा (Virat Kohli) हा १०० वा कसोटी सामना होता. या सामन्यात कोहलीने ४५ धावांची खेळी करत आपल्या ८ हजार धावा पूर्ण केल्या. याशिवाय अश्विनने या सामन्यात कपिल देव यांचा ४३४ विकेटचा मोठा विक्रम देखील मागे टाकला. सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “ही एक चांगली सुरुवात आहे. आम्हाला ज्या ज्या क्षेत्रात चांगले करायचे आहे ते आम्ही केले. खरं तर हा कसोटी सामना तीन दिवसांत संपेल असे आम्हाला वाटले नव्हते. फलंदाजीसाठी ती चांगली खेळपट्टी होती. शिवाय वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली.”
तो पुढे म्हणाला, “या सामन्याचे श्रेय त्या गोलंदाजांना जाते, ज्यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना कधीही मनसोक्तपणे खेळू दिले नाही. आम्ही फक्त त्याच्यावर दोन्ही बाजूंनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होतो. भारतीय संघासाठी हे चांगले संकेत आहेत. विराटसाठी हा ऐतिहासिक कसोटी सामना होता आणि आम्हाला तो जिंकायचा होता. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या सामन्याचे आकर्षण ठरला. जडेजाने या सामन्यात फक्त नाबाद १७५ धावा केल्या नाहीत, तर ९ विकेट्सही घेतल्या.”
या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना १२ मार्च रोजी बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला टी२० नंतर कसोटीत श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप करायचा आहे. या अगोदर झालेल्या टी२० मालिकेत देखील भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
आधी संघाला बनवलं विश्वविजेता अन् आता रणजीमध्ये धूलने केला कहर कारनामा; अवघ्या ३ सामन्यात ठोकलं शतक
पहिली कसोटी: भारताने श्रीलंकेचा उडवला धुव्वा, फक्त ३ दिवसातच १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला सामना
ब्रेकिंग! आयपीएल २०२२चे वेळापत्रक जाहीर; चेन्नई सुपर किंग्स अन् ‘या’ संघात होणार पहिला सामना