भारतीय क्रिकेटपटू सध्या आयपीएल २०२२ खेळण्यात व्यस्त आहेत. २९ मे रोजी आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा अंतिम सामना होईल. त्यानंतर भारतीय संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. ९ जून ते १९ जून दरम्यान होणाऱ्या या टी२० मालिकेसाठी रविवारी (२२ मे) भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात या मालिकेसाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना निवडले जाईल, याबद्दल माहिती घेऊ.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय, BCCI) आगामी मालिकांचे वेळापत्रक पाहता बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकतात. अशात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली केएल राहुल, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. अशात या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत कोणकोणत्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa Series Of India) मालिकेसाठी संधी दिली जाईल, यावर सर्वांचे लक्ष असेल.
रोहितच्या अनुपस्थितीत कोणता खेळाडू त्याची जागा घेत भारतीय संघाचा कर्णधार बनेल, हा सर्वात मोठा प्रश्न संघ व्यवस्थापकांपुढे असेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, अष्टपैलू हार्दिक पंड्या याला भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार निवडले जाऊ शकते. कारण आयपीएल २०२२मध्ये गुजरात संघाचे नेतृत्त्व करताना त्याने स्वताला सिद्ध केले आहे. त्याच्या नेतृत्त्वाखालीच गुजरातने सर्वात आधी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. तसेच यादरम्यान त्याने बॅट आणि चेंडू दोन्हीनेही शानदार प्रदर्शन केले आहे.
या खेळाडूंना मिळू शकते संधी
वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत तिलक वर्मा, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि मोहसिन खास अशा खेळाडूंना पहिल्यांदाच भारतीय संघात निवडले जाऊ शकते. तसेच हार्दिक पंड्या, शिखर धवन, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांसारख्या अनुभवी खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. असेही म्हटले जात आहे की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निवडलेला हाच संघ आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठीही (T20 Series) कायम राहू शकतो.
असा असू शकतो भारतीय संघ-
हार्दिक पांड्या (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, सूर्यकुमार यादव (तंदुरुस्तीवर अवलंबून)/तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, उमरान मलिक/अर्शदीप सिंह/मोहसिन खान, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा