मुंबई । भारतीय संघाने घरच्या मैदानावर गेल्या सात वर्षात एकही कसोटी मालिका गमावली नाही. 2012-13 पासून भारताचा विजयी रथ चौफेर दौडत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा संघ भारतीय संघाला मायदेशात हरवू शकतो, असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग याने केले आहे.
एका यूट्यूब चॅनलशी बोलताना ब्रॅड हॉग म्हणाला की, “पाकिस्तान संघाकडे दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. तसेच पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये ते कमाल करू शकतात.”
“सध्याचा पाकिस्तानचा संघ सर्वोत्कृष्ट आहे. उत्तम दर्जाचे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू त्यांच्याकडे आहेत. त्यांची फलंदाजी देखील मजबूत आहे.”
क्रिकेटप्रेमी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील मालिकेची द्विपक्षीय मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. दोन्ही संघात 2012 सालानंतर कोणतीच द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली नाही. दोन्ही संघात 2007 साली अखेरची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. पाकिस्तानचा संघ तीन कसोटी आणि पाच वनडे सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता.
“पाकिस्तानचा संघ भारतात किंवा भारतीय संघ पाकिस्तान दौऱयावर जाण्याची शक्यता फार कमी आहे. पाकिस्तान संघानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ असा आहे जो की भारतीय संघाला भारतात हरवू शकतो. ऑस्ट्रेलियाजवळ स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन सारखे फलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया संघाजवळ मजबूत फलंदाजी बरोबर भेदक गोलंदाजीचा ताफादेखील आहे,” असे ब्रॅड हॉगने सांगितले.
49 वर्षीय ब्रॅड हॉग ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 7 कसोटी सामन्यात 17 बळी टिपले तर 124 वनडे सामन्यात 157 बळीची नोंद त्याच्या नावावर आहे.