Vikram Rathor On Rinku Singh : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याच्यासाठी नुकताच संपलेला झिम्बाब्वे दौरा फारसा फलदायी ठरला नाही. या दौऱ्यावर त्याला फलंदाजीची जास्त संधी देखील मिळाली नव्हती. सध्या तो केवळ भारताच्या टी20 संघाचा सदस्य आहे. मात्र, त्याला भारताच्या कसोटी संघातही जागा मिळावी, असे भारताच्या माजी प्रशिक्षकांनी सुचवले आहे.
टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचा कार्यकाळ समाप्त झाला. ते 2019 पासून भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. या काळात त्यांनी भारताच्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे मदत केल्याचे सांगितले जाते. त्यांना त्यांचा कार्यकाळ वाढवून मिळण्याची शक्यता मात्र कमी आहे. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर हा फलंदाजी प्रशिक्षक या जागेसाठी अभिषेक नायर याच्या नावासाठी आग्रही असल्याचे समजते.
विश्वचषक विजयानंतर राठोड यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. युवा फलंदाज रिंकू सिंग याच्याबद्दल बोलताना राठोड म्हणाले, “मी जेव्हा केव्हा रिंकू सिंग याला फलंदाजी करताना पाहिले त्यावेळी मला त्याच्या फलंदाजीत कोणतीही त्रुटी जाणवली नाही. त्याचे खेळाचे तंत्र अतिशय योग्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “रिंकूची प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सरासरी 54 पेक्षा जास्त असल्याचे दिसते. तो अतिशय थंड डोक्याने फलंदाजी करतो. त्याला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आणि त्याच्यावर विश्वास दाखवल्यास तो भारताच्या कसोटी संघातही योगदान देईल.”
सध्या भारताच्या कसोटी संघात सर्फराज खान व ध्रुव जुरेल हे सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतात. तसेच रिषभ पंत बरा होऊन आल्याने, रिंकू याला कसोटी संघातील जागेसाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो. असे असले तरी टी20 संघाचा तो भविष्यातील मोठा स्टार मानला जातो. भारतीय संघाचा फिनिशर म्हणून त्याने आतापर्यंत आपल्या छोट्याशा कारकीर्दीत ठसा उमटवला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यावर देखील तो भारतीय संघाचा भाग असण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
आंद्रे रसलची एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?