---Advertisement---

INDvsENG 1st Test: पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ३ बाद २६३ धावा, कर्णधार जो रूट शतकासह नाबाद; बुमराहच्या २ विकेट्स

On: शुक्रवार, फेब्रुवारी 5, 2021 5:04 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) होत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात ८९.३ षटकात ३ बाद २६३ धावा केल्या आहेत.

या सामन्यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रुटने त्याची चांगली लय कायम ठेवताना शतकी खेळी केली आहे. मात्र, डॉम सिब्ली शतकाच्या जवळ असताना बाद झाला. त्याला ८७ धावांवर जसप्रीत बुमराहने पायचीत केले.

असे असले तरी रुट आणि सिब्ली या दोघांनीही पहिल्या दिवशी चिवट झुंज देताना द्विशतकी भागीदारी केली आहे. त्यांनी पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रानंतर भारतीय गोलंदाजांना विकेट मिळू दिली नव्हती. मात्र, दिवसाच्या शेवटच्या षटकात बुमराहने सिब्लीला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. तो बाद झाल्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले.

पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात ८९.३ षटकात ३ बाद २६३ धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या दिवसाखेर जो रुट १९७ चेंडूत १२८ धावांवर नाबाद राहिला आहे. दिवसाखेरपर्यंत भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने २ विकेट्स तर आर अश्विनने १ विकेट घेतली आहे.

रुटचे शतक 

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने शतक पूर्ण केले आहे. रुटने त्याचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याच्या फलंदाजीचा अंदाज काहीसा बदलत थोडा आक्रमक खेळ केला. त्याने ७८ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध खेळताना १६४ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २० वे शतक आहे. विशेष म्हणजे रुटचा हा १०० वा कसोटी सामना आहे.

याशिवाय रुटने डॉम सिब्लीसह दिडशतकी भागीदारीही पूर्ण केले आहे. सिब्ली आणि त्याने दुसरे सत्र सुरु झाल्यापासून भारतीय गोलंदाजांना विकेट मिळून दिलेलीच नाही. या दोघांनीही भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी थकवले आहे. या दोघांच्या चिवट झुंज देण्यामुळे इंग्लंडने ७४ व्या षटकांत २०० धावांचा आकडाही पार केला. तसेच सिब्लीही शतकाच्या जवळ पोहचला आहे.

इंग्लंडने ७८ षटकांत २ बाद २२७ धावा केल्या आहे. इंग्लंडकडून रुट १६४ चेंडूत १०० धावांवर नाबाद खेळत आहे. तर सिब्ली २५० चेंडूत ८३ धावांवर नाबाद खेळत आहे. या दोघांनी १६४ धावांची तिसऱ्या विकेटसाठी नाबाद भागीदारीही केली आहे.

डॉम सिब्ली पाठोपाठ जो रुटनेही अर्धशतक पूर्ण केले

रुटने पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर लगेचच ५९ व्या षटकात ११० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने हे अर्धशतक चौकार ठोकत पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे ५० वे अर्धशतक आहे.

रुटने हे अर्धशतक केल्यानंतर ६० व्या षटकात इंग्लंडच्या १५० धावाही पू्र्ण झाल्या आहेत.

इंग्लंडने पहिल्या डावात ६० षटकांत २ बाद १५३ धावा केल्या आहेत. सध्या इंग्लंडकडून रुट ११६ चेंडूत ५५ धावांवर नाबाद खेळत आहे. तर सिब्ली १८९ चेंडूत ५५ धावांवर नाबाद खेळत आहे.

पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर इंग्लंडच्या ५७ षटकात २ बाद १४० धावा 

इंग्लंडकडून जो रुट आणि डॉम सिब्लीने दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही यश मिळू दिले नाही. या दोघांनी दुसऱ्या सत्रात नाबाद फलंदाजी करत इंग्लंडला १४० धावांचा टप्पा पार करुन दिले. तसेच दुसरे सत्र इंग्लंडच्या नावावर केले. या दोघांनी दुसऱ्या सत्राखेर  तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांनी नाबाद भागीदारी केली आहे.

या सत्रात भारताकडून जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, आर अश्विन, शहाबाज नदीम अशा सर्वांनी या दोघांना बाद करण्याचे प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

इंग्लंडने दुसरे सत्र संपले तेव्हा पहिल्या डावात ५७ षटकांत २ बाद १४० धावा केल्या आहेत. रुट १०० चेंडूत ४५ धावांवर नाबाद खेळत आहे. तर सिब्ली १८६ चेंडूत ५३ धावांवर नाबाद खेळत आहे.

सिब्लीचं अर्धशतक पूर्ण 

पहिल्या सत्रात चांगल्या सुरुवातीनंतरही बर्न्स आणि लॉरेन्स यांच्या विकेट्स लागोपाठ गमावल्यानंतर जो रुट आणि सिब्लीने इंग्लंडला सांभाळले आहे. हे दोघेही सावध खेळत असून एकेरी-दुहेरी धावांवरच अधिक भर देत आहेत. तसेच खराब चेंडूवर चौकार वसुल करत आहेत. भारतीय गोलंदाजांना दुसरे सत्र सुरु होऊन २० षटके झाले तरी बाद करता आलेले नाही.

या दोघांच्या सावध खेळण्यामुळे इंग्लंडने ४४ षटकांत १०० धावांचा आकडा पार केला आहे. तसेच ५१ व्या षटकात सिब्लीने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्याने १५९ चेंडूंचा सामना करताना हे अर्धशतक पूर्ण केले.

सध्या इंग्लंडने पहिल्या डावात ५१ षटकांत २ बाद १२४ धावा केल्या आहेत. रुट ८५ चेंडूत ३३ धावांवर नाबाद खेळत आहे. तर सिब्ली १६३ चेंडूत ५१ धावांवर नाबाद खेळत आहे. या दोघांनी नाबाद ६१ धावांची भागीदारीही तिसऱ्या विकेटसाठी रचली आहे.

अश्विनने भारताला मिळवून दिला ब्रेक-थ्रू

इंग्लंडच्या रॉरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्ली या सलामीवीरांच्या जोडीने काही शानदार फटके मारत आणि एकेरी-दुहेरी धावांवर भर देताना पहिल्या २० षटकांत भारतीय गोलंदाजांना मोठे यश मिळू दिले नाही. त्यांनी २० षटकात इंग्लंडला ५० धावांचा टप्पाही पार करुन दिला होता.

अखेर आर अश्विनने २४ व्या षटकात रॉरी बर्न्सला बाद केले. बर्न्स ६० चेंडूत ३३ धावा करुन यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर २६ व्या षटकात लगेचच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅनिएल लॉरेन्सला जसप्रीत बुमराहने पायचीत बाद केले. लॉरेन्स शुन्यावर बाद झाला. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रुट फलंदाजीला आला आहे.

रुट फलंदाजीला आल्यानंतर २७ व्या षटकांत धावबाद होता होता वाचला. इंग्लंडने पहिल्या सत्राखेर पहिल्या डावात २७ षटकांत २ बाद ६७ धावा केल्या आहेत. सध्या रुट ४ धावांवर आणि सिब्ली २६ धावांवर नाबाद खेळत आहे.

इंग्लंड संघाकडून सलामीवीरांची सावध सुरुवात 

इंग्लंडकडून रॉरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्लीने फलंदाजीची सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीला अत्यंत सावध खेळ केला आहे. त्यांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध नव्या चेंडुवर फार मोठा धोका न पत्करता एकेरी-दुहेरी धावा काढल्या. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या षटकात बर्न्सला जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक रिषभ पंतकडून जीवदान मिळाले. पंतने यष्टीमागे बर्न्सचा अवघड झेल सोडला. त्यामुळे बर्न्सला जीवदान मिळाले.

पहिल्या १० षटकांनंतर इंग्लंडने बिनबाद २० धावा केल्या आहेत. सिब्ली ८ धावांवर आणि बर्न्स ११ धावांवर खेळत आहे.

इंग्लंडने जिंकली नाणेफेक 

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारतीय संघात नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय भारतीय संघात इशांत शर्माचेही पुनरागमन झाले आहे. तसेच पहिल्या कसोटीसाठी अंतिम ११ जणांच्या संघात रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळाली आहे. तर शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर हे अंतिम ११ जणांच्या संघात कायम आहेत. याबरोबरच शहाबाज नदीमलाही भारताच्या ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.

इंग्लंड संघाचा विचार करायचा झाल्यास त्यांच्या ११ जणांच्या संघात अष्टपैलू बेन स्टोक्स, सलामीवीर रॉरी बर्न्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचे पुनरागमन झाले आहे. हा सामना इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा १०० वा सामना आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

भारतीय संघ – 

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम

इंग्लंडचा संघ – 

रॉरी बर्न्स, डोमिनिक सिब्ली, डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), डोमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अँडरसन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---