कोणत्याही संघाचे कर्णधारपद मिळणे हा मोठा गौरव असतो. त्यातही जर कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर तो कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सन्मान असतो. आत्तापर्यंत कसोटीमध्ये ३३८ खेळाडूंनी किमान एका तरी सामन्यात नेतृत्व केले आहे. आत्तापर्यंतच्या कसोटी इतिहासातील कर्णधारांच्या आकडेवाडीचा विचार केला तर काही मनोरंजन आकडेही समोर येतात. अशाच काही मनोरंजक आकडेवारीचा घेतलेला हा आढावा –
सर्वाधिक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळणारे क्रिकेटपटू –
कसोटीमध्ये सर्वाधिक १४ कर्णधारांच्या नेतृत्वाखाली फ्रँक वूली खेळले आहेत. त्यांनी कारकिर्दीत एकूण ६४ कसोटी सामने खेळले. यात त्यांना १४ कर्णधार लाभले. तसेच शिवनारायण चंद्रपॉलने १३ कर्णधारांच्या नेतृत्वाखाली कसोटी सामने खेळले आहेत. तर मुश्ताक अहमद, जॅक होब्स आणि इंजमाम-उल-हक प्रत्येकी १२ कर्णधारांच्या नेतृत्वाखाली कसोटीत खेळले आहेत.
नुकताच ८ ते १२ जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी सामना पार पडला. या सामन्यात बेन स्टोक्सने इंग्लंडचे नेतृत्व केले. यावेळी इंग्लंडकडून १५२ कसोटी खेळणाऱ्या जेम्स अँडरसनसाठी स्टोक्स हा त्याचा ८ वा कसोटी कर्णधार होता.
सर्वात कमी कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळणारा क्रिकेटपटू –
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क टेलरने त्याच्या कारकिर्दीत १०४ कसोटी सामने खेळले. त्यात त्याने केवळ २ कर्णधार पाहिले. त्याने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या ५४ कसोटी ऍलेन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली खेळले. तर नंतरच्या ५० कसोटीमध्ये स्वत:च संघाचे नेतृत्व केले. टेलर असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने १०० पेक्षाही अधिक कसोटी सामने खेळूनही केवळ २ कर्णधार पाहिले. त्यातही दुसरा कर्णधार तो स्वत: होता.
एकाच कर्णधाराच्या नेतृत्वाखाली कारकिर्दीतील सर्व सामने खेळणारा खेळाडू –
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मर्व ह्यूज हे असे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील सर्व ५३ सामने ऍलेन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली खेळले. जेव्हा मर्व यांनी कसोटी पदार्पण केले तेव्हा बॉर्डर हेच त्यांचे कर्णधार होते. तर जेव्हा मर्व यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला तेव्हाही बॉर्डरच कर्णधार होते.
२२ कसोटीत ९ कर्णधार पाहिलेला खेळाडू –
वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू जॉर्ज हेडली यांनी २२ कसोटी सामने त्यांच्या कारकिर्दीत खेळले. या कारकिर्दीत त्यांनी एकूण ९ कर्णधार पाहिले.
कर्णधार न बनता सर्वाधिक कसोटी खेळणारे क्रिकेटपटू –
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत १५२ कसोटी सामने खेळला आहे. परंतू त्याने एकदाही इंग्लडचे नेतृत्व केलेले नाही. त्यामुळे तो कोणत्याही कसोटी सामन्यात कर्णधार न बनता सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू आहे.
त्याच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्ननेही कधी कसोटीत नेतृत्व केले नाही, पण त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण १४५ कसोटी सामने खेळले आहेत.
कारकिर्दीतील सर्व कसोटी सामन्यात कर्णधार –
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू पर्सी शेरवेल १९०६-१९११ च्या दरम्यान एकूण १३ कसोटी सामने खेळले, त्यातील सर्व सामन्यात ते कर्णधार होते.
लारा-स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळले प्रत्येकी ५६ खेळाडू
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी ५६ वेगवेगळे खेळाडू खेळले. हा एक विक्रम आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांच्या नेतृत्वाखाली केवळ ६ खेळाडूंचे पदार्पण झाले. ५० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यात नेतृत्व केलेल्या कर्णधारांमध्ये ते असे कर्णधार आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली सर्वात कमी खेळाडूंनी पदार्पण केले.
वाचनीय लेख –
हेन्री ओलोंगा: थेट आपल्याच देशाच्या राष्ट्रपतीला भिडलेला क्रिकेटर
भारतीय संघाने कसोटीत आजमावल्यात १५ सलामी जोड्या; पहा मागील ५ वर्षात कोण आहे बेस्ट?
असे ३ दिग्गज खेळाडू ज्यांनी रचले मोठे विक्रम, पण कर्णधार म्हणून ठरले फ्लॉप