सध्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघात चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून यातील तिसऱ्या सामन्यावरून मात्र क्रिकेट विश्वात घमासान चर्चा होताना दिसत आहे. अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला. भारताने या सामन्यात १० गडी राखून विजय मिळवला.
मात्र दोनच दिवसात निकाल लागल्याने आता या सामन्यातील खेळपट्टीवरुन वादंग निर्माण झाला आहे. काही खेळाडूंनी खेळपट्टीचा दोष नसून फलंदाजांकडे तंत्राचा अभाव असल्याने सामना लवकर संपला असे मत मांडले. तर काहींनी खेळपट्टी अतिशय निकृष्ट दर्जाची होती असे मत मांडले. या चर्चेत आता पाकिस्तानचा माजी फलंदाज इंझमाम उल हकने देखील उडी घेतली आहे. त्याने या खेळपट्टीवर सडकून टीका केली आहे.
“कसोटी क्रिकेटसाठी अशी खेळपट्टी घातक”
अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत बोलताना इंझमाम उल हक म्हणाला, “कोणीच विचार केला नसेल किंवा कोणालाच वाटलं नसेल की कसोटी सामना दोन दिवसात संपेल. अशा प्रकारची खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी अजिबात योग्य नाही. भारतीय संघ चांगला खेळला की खेळपट्टी वाईट दर्जाची होती? माझ्यामते नक्कीच खेळपट्टीचा दर्जा योग्य नव्हता. आयसीसीने यावर कारवाई करायला हवी. अन्यथा अशा प्रकारच्या खेळपट्ट्या अजून तयार केल्या जातील.”
क्रिकेटपासून जरा लक्ष दुसरीकडे वळवा, तरच, कर्णधार जो रूटचा संघ सहकार्यांना सल्ला
या शहरात आयोजित व्हावे आयपीएलचे सामने, थेट मुख्यमंत्र्यांचीच बीसीसीआयला विनंती