इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत ज्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाच्या खेळाडूंचाही समावेश आहे. चेन्नईचा विस्फोटक फलंदाज शिवम दुबे याने आयपीएल 2023 हंगामात सीएसकेला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र, त्याला घडवण्याचे श्रेय एमएस धोनी याचे आहे. आता शिवम दुबेने एमएस धोनीविषयी वक्तव्य केले आहे.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघासाठी शिवम दुबे (Shivam Dube) याने 16 सामने खेळताना 14 डावात 38च्या सरासरीने 418 धावा केल्या. महत्त्वाची बाब अशी की, त्याने या धावा 158.33च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने केल्या. याव्यतिरिक्त षटकार मारण्याच्या बाबतीतही तो आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (36 षटकार) याच्यानंतर दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 35 षटकार मारले आहेत.
शिवम दुबे याच्या कामगिरीत सुधारणा करण्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने मोलाचा वाटा उचलला आहे. धोनीने दुबेला मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यानंतर त्यानेही जोरदार षटकारांच्या मदतीने विरोधी संघ आणि गोलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. गुजरात टायटन्स संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यातही दुबेने 21 चेंडूत नाबाद 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. यामध्येही 2 षटकारांचा समावेश होता.
धोनीविषयी काय म्हणाला दुबे?
शिवम दुबे 29 वर्षांचा असून त्याने माध्यमांशी बोलताना आयपीएलमधील शानदार प्रदर्शनाचे श्रेय धोनीला दिले. तो म्हणाला की, “धोनीने माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला. त्यांनी मला मैदानावर जाऊन आपल्या पद्धतीने खेळण्यास सांगितले.. पुढे बोलताना दुबेने सांगितले की, “धोनी मला म्हणाले की, तुझ्या क्षमतांवर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की, तू चांगलं करशील. तू आपला गेम बिंधास्त खेळ. तुला संघातील तुझ्या भूमिकेविषयी जास्त विचार करण्याची गरज नाहीये. तुला वाटेल तसे तू खेळ,”
आयपीएल 2023च्या तयारीसाठी होता कमी वेळ
आयपीएलमध्ये येताना चिंतेत होता का? या प्रश्नाचे उत्तर देताना दुबे म्हणाला की, “असे काही नाही. रणजी ट्रॉफीदरम्यान माझ्या हातात दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएलसाठी जास्त तयारी करू शकलो नाही. स्पर्धेच्या तयारीसाठी माझ्याकडे खूप कमी वेळ होता, पण मी मानसिकरीत्या चांगल्या स्थितीत होतो. मी मागील हंगामातही चेन्नईसाठी चांगले प्रदर्शन केले होते. यावेळीही मी विश्वासाने भरलेला आहे.” त्याला मोठे फटके मारण्याच्या गुपिताविषयी विचारल्यावर दुबे म्हणाला की, “मी नेट्समध्ये याचा सराव करतो.” खरं तर, शिवम दुबेला युवराज सिंग याच्याप्रमाणे लांब षटकार मारण्यासाठी ओळखले जाते.
एका षटकात पाच षटकार मारून आलेला चर्चेत
विशेष म्हणजे, आयपीएल 2019च्या लिलावापूर्वी शिवम दुबेने बडोदा संघाविरुद्धच्या सामन्यात एका षटकात 5 षटकार मारले होते. चेंडू मारण्याची दुबेची क्षमता ओळखून आरसीबी संघाने त्याला 2019च्या हंगामासाठी 5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. दोन हंगाम खेळल्यानंतर तो 2020मध्ये राजस्थानशी जोडला गेला. त्यानंतर 2022मध्ये तो 4 कोटी रुपयात चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाला. (ipl 2023 csk skipper ms dhoni gave free hand to shivam dubey for attacking batting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023मध्ये अजिंक्य रहाणे कसा बनला विस्फोटक फलंदाज? चेन्नईच्या हेड कोचने सांगितलं गुपीत
जड्डूने विजयी चौकार मारताच चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’, चेन्नईच्या मेट्रो स्टेशनमध्येच घातला राडा, Video