इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेचा किताब आपल्या संघाला जिंकून देऊन अष्टपैलू हार्दिक पंड्या याने चांगलीच वाहवा मिळवली. कर्णधार म्हणून मागील हंगामात पंड्याने गुजरात टायटन्स या संघाला पदार्पणातील पहिला आयपीएल किताब जिंकून दिला. एवढेच नाही, तर तो अष्टपैलू कामगिरी करत भारतीय संघाचा अविभाज्य घटक बनला. आता एक वर्षानंतर हार्दिक पुन्हा एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्याप्रमाणे ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशात सुनील गावसकर यांनी पंड्याविषयी मोठे भाष्य केले आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ आयपीएल इतिहासात सलग दोन किताब जिंकणारा तिसरा संघ बनू शकतो. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याचा प्रयत्न करेल. गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात भिडणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रविवारी (दि. 28 मे) पार पडणार आहे.
धोनीकडून घेतले क्रिकेटचे धडे
पंड्याने सीएसके (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्याकडून क्रिकेटच्या अनेक बारीक गोष्टी शिकल्या आहेत. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी हार्दिक पंड्याचे नेतृत्व आणि एमएस धोनीसोबतची मैत्री याबाबत मोठे विधान केले आहे.
‘मैदानावर वेगळे वातावरण’
गावसकर म्हणाले की, “हार्दिक पंड्या नेहमीच धोनीची प्रशंसा करतो. तसेच, धोनीविषयीच्या प्रेमाविषयी बोलतो. अगदी त्याच खेळाडूंप्रमाणे, ज्यांनी धोनीची कारकीर्द पाहिली आहे. जेव्हा धोनी आणि हार्दिक नाणेफेकीला जातात, तेव्हा ते एकदम मित्रांप्रमाणे हसत जातात. मात्र, जेव्हा मैदानावर सामना होतो, तेव्हा वातावरण वेगळे असते.”
गावसकर म्हणाले की, “जेव्हा पंड्या मागील हंगामात पहिल्यांदा नेतृत्व करत होता, तेव्हा कोणालाही माहिती नव्हेत की, त्याच्याकडून काय अपेक्षा करावी. कारण, तो सर्वात रोमांचक आणि उत्साहित क्रिकेटपटूंपैकी एक आहे.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “आम्ही मागील हंगामात हार्दिकला एक रोमांचक रूपात पाहिले. हार्दिक संघात शांत वातावरण निर्माण करतो, जे आपल्याला एमएस धोनीची आठवण करून देते. गुजरात हा आनंदी संघ आहे, जे आपण सीएसकेसोबतही पाहतो. याचे भरपूर श्रेय हार्दिकलाही जाते.”
रंजक बाब अशी की, पंड्याने कधीच आयपीएलचा अंतिम सामना गमावला नाहीये. पंड्या या हंगामात अंतिम सामन्यापूर्वी 16 सामन्यात 29.55च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत. तो गुजरातसाठी हंगामात दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. (ipl former cricketer sunil gavaskar lauds at hardik pandya ahead of ipl 2023 final csk vs gt)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं रे पठ्ठ्या! सराव सत्रातच दुबेचा राडा, IPL फायनलमध्ये होणार तांडव; मोठा विक्रम निशाण्यावर, Video
कपिल पाजींची शुबमन गिलला वॉर्निंग! म्हणाले, ‘सचिन-विराटच्या दर्जाचा नाही, फॉर्म गेल्यावर…’