fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आएसएल: ओडिशाचा मुंबईवर सनसनाटी विजय

मुंबई। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) ओडिशा एफसीने गुरुवारी मुंबई सिटी एफसीवर 4-2 असा सनसनाटी विजय मिळविला. ओडिशा एफसीचा हा मोसमातील पहिलावहिला विजय आहे. गतमोसमात दिल्ली डायनॅमोज नावाने सहभागी झालेल्या या संघासाठी तिसऱ्या सामन्यात नाव आणि स्थळातील बदल फलदायी ठरला. पूर्वार्धातच तीन गोल करीत ओडिशाने विजय जवळपास नक्की केला.

स्पेनच्या अरीडेन सँटाना याने दोन, त्याच्याच देशाच्या झिस्को हर्नांडेझने एक गोल केला. भारतीय खेळाडू जेरी माहमिंगथांगा यानेही एका गोलचे योगदान दिले. जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना या संघाने जोर्गे कोस्टा यांच्या मुंबईला त्यांच्याच मैदानावर गारद केले. ओडिशाने या निर्णायक विजयासह गुणांचे खातेही थाटात उघडले. तीन सामन्यांतून तीन गुणांसह त्यांनी सहावे स्थानही गाठले. मुंबईला तीन सामन्यांत प्रथमच पराभूत व्हावे लागले. एक विजय व एका बरोबरीसह त्यांचे चार गुण आणि पाचवे स्थान कायम राहिले.

मुंबई सिटीविरुद्ध यंदा तिसऱ्या सामन्यात प्रथमच गोल झाला. सहाव्याच मिनिटाला हे घडले. हर्नांडेझच्या गोलसह ओदीशाने खाते उघडले तेव्हा मुंबई फुटबॉल एरीनावरील प्रेक्षक स्तब्ध झाले. थ्रो-इनवर सँटानाकडे चेंडू गेला. त्याच्या हेडींगवर हर्नांडेझने उजवीकडून मुसंडी मारत पेनल्टी क्षेत्र गाठले. त्यावेळी मुंबईचा प्रतिक चौधरी त्याचा पाठलाग करीत होता, पण फटका मारण्याची नुसती अॅक्शन करीत हर्नांडेझने त्याला चकविले. मग त्याने मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंगला चकविले.

ओडिशाचा 21व्या मिनिटाला झालेला दुसरा गोल अप्रतिम होता. शुभम सारंगीने मध्य क्षेत्रातून चाल रचली आणि उजवीकडून जेरी माहमिंगथांगाला मोकळीक मिळाली. आपल्याला प्रतिस्पर्ध्याने घेरल्याचे लक्षात येताच जेरीने सँटानाला संधी असल्याचे ताडले. मग त्याने पास देताच सँटानाने शांतचित्ताने एका फटक्यात चेंडू नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारला.

मध्यंतरास चार मिनिटे बाकी असताना ओडिशाने तिसरा गोल नोंदवित मुंबईच्या गोटात खळबळ उडवून दिली. शुभम सारंगीने डावीकडून क्रॉस पास देताच नंदकुमार शेखरने चेंडू मारला, पण तो क्रॉसबारला धडकला. रिबाऊंडवर दक्ष जेरीने संधी साधली.

दुसऱ्या सत्रात 50 व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्रात पाऊलो मॅचादोने सर्जी केव्हीनला हेडींगवर पास दिला. त्याचवेळी ओडिशाचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरोने सर्जीला पाडले. त्यामुळे पंच ए. रोवन यांनी मुंबईला पेनल्टी बहाल केली. त्यावर लार्बीने अचूक फटका मारला.

दुसऱ्या सत्रात ओडिशाने एकूण चौथा गोल नोंदविला. सँटाना या गोलचा मानकरी होता. जेरीने उजवीकडून दिलेल्या पासवर त्याने हेडींग केले. सुमारे सहा यार्ड अंतरावरून त्याने सफाईने गोल नोंदविला.

भरपाई वेळेत बदली खेळाडू बिपीन सिंगने मुंबईला पिछाडी कमी करण्याचा दिलासा दिला. पाऊलो मॅचादो याच्याऐवजी तो 76व्या मिनिटास मैदानावर उतरला होता.

You might also like