भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्म्रीती मंधनाची प्रतिष्ठीत विस्डेन इंडिया अल्मनॅक क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याबद्दल शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या दोन्ही क्रिकेटपटूसह 5 जणांना हा पुरस्कार मिळणार आहे.
आशियातील अन्य विजेत्यांमध्ये पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज फखर जमान, श्रीलंका संघाचा कर्णधार दिमुख करूणारत्ने आणि अफगानिस्तानचा फिरकीपटू राशिद खान यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर विस्डेन 2019-2020 च्या वार्षिक क्रिकेट प्रकाशनाच्या सातव्या आवृत्तीत मयंक अगरवालचेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे.
तसेच या वर्षीचा विस्डेन इंडिया अल्मनॅक क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारी स्म्रीती मंधाना ही तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी हा पुरस्कार कर्णधार मिताली राज आणि गोलंदाज दिप्ती शर्मा यांना मिळाला होता.
याबरोबरच भारताचे माजी फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ आणि लाला अमरनाथ यांना विस्डेन इंडिया हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तर प्रशांत किदांबी यांचे पहिल्या भारतीय संघाचा इतिहास सांगणारं ‘क्रिकेट कंट्री: द अनटोल्ड हिस्ट्री ऑफ द फर्स्ट ऑल इंडिया टीम’ हे पुस्तक विस्डेन इंडियाचे ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट पुस्तक’ म्हणून निवडले आहे.






