ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारताला 3 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे, तर नवीन आणि युवा खेळाडूंना या दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले आहे. शुक्रवारी (दि. 18 नोव्हेंबर) वेलिंग्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना खेळला जाणार होता, पण तो पावसामुळे रद्द झाला. यादरम्यान भारतीय मूळ असलेल्या एका चाहत्याला न्यूझीलंडच्या विस्फोटक खेळाडूचा ऑटोग्राफही मिळाला.
झाले असे की, भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला सामना रद्द झाल्यामुळे खेळाडूंनी खूपच मजा-मस्ती केली. काही खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना ऑटोग्राफही दिले. अशात न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “कॉईन टॉस किड राजबीरसाठी एक यादगार क्षण.”
न्यूझीलंडचा मधल्या फळीतील विस्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याने भारतीय मूळ असणारा लहान मुलगा राजबीर याला ऑटोग्राफ दिला. हा मुलगा सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यान दोन्ही कर्णधारांसोबत उभा होता. मात्र, नाणेफेक आणि सामना दोन्हीही न झाल्यामुळे ग्लेन फिलिप्सने ऑटोग्राफ देऊन या मुलाचा दिवस खास केला. फिलिप्स स्वत: चालून या मुलाकडे आला. तसेच, त्याला आपली ओळख सांगताना म्हणाला की, “मित्रा मी ग्लेन आहे, आणि तू?” फिलिप्सला उत्तर देत मुलाने म्हटले की, “मी राजबीर आहे.” यानंतर फिलिप्सने मुलाकडून दोन बॅट मागितल्या आणि त्यावर आपला ऑटोग्राफ दिला.
भारत आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी खेळला फूटवॉली सामना
भारत आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळता आले नाही. मात्र, मैदानाबाहेर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एक वेगळ्याप्रकारचा खेळ खेळला. दोन्ही संघांचे खेळाडू फुटबॉलने एक वेगळ्या प्रकारचा खेळ खेळताना दिसले. बीसीसीआयने व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “वेलिंग्टनमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसाचा सामना करण्यासाठी खेळाडू फूटवॉली खेळताना.”
आता भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा सामना रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) माऊंट माऊंगनुई येथे खेळला जाईल. या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (kid rajbir gets autograph new zealand batsman glenn phillips nz vs ind 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: विश्वचषकातील पराभवाचे खापर फोडत बीसीसीआयने बरखास्त केली संपूर्ण निवडसमिती
‘त्याला मी रोखणार नाही, पण…’, आयपीएल 2023मधून बाहेर पडणाऱ्या कमिन्सचे ‘या’ अष्टपैलूबद्दल वक्तव्य