पुणे । जम्मू ( जम्मू आणि काश्मीर) येथे संपन्न झालेल्या २८ व्या सिनिअर राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाने १ सुवर्ण ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई करून चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये पुण्याच्या श्रावणी कटके हिने सुवर्णपदकाची कमाई केली.
ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केली आहे. स्पर्धेत मिताली वाणी हिने २ रौप्यपदक, गजानन पवार याने रौप्य, तुप्ती चांदवडकर, स्नेहल बडसकर, आणि स्नेहा जायभाय यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक पटकाविले.
या सर्व खेळाडूंचे ऑल इंडीया वुशू असोसिएशनचे अध्यक्ष भुपेंदर सिंग बाजवा , महासचिव सोहेल अहमद आणि ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. झेंडे साहेब तसेच महाराष्ट्र ऑलंपिक संघटनेचे महासचिव बाळासाहेब लांडगे व पुणे जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान यांनी अभिनंदन केले.
सोपान कटके म्हणाले, राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाने चांगली तयारी केली होती.स्पर्धेसाठी ऑल इंडीया वुशू असोसिएशन आणि ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनने सहकार्य केले.
स्पर्धेत विविध राज्यातील ११०० स्पर्धक सहभागी झाले होते. सरावा शिबिरादरम्यान खेळाडूंची चांगली तयारी झाली होती. त्यामुळे स्पर्धकांना पदके पटकाविण्यात यश आले.