भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या कारकीर्दीला योग्य वळण देणाऱ्या गोलंदाजांचा खुलासा केला आहे. या गोलंदाजांपैकी एक गोलंदाज हा भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. तर दुसरा गोलंदाज हा पाकिस्तान संघाचा माजी महान गोलंदाज वसीम अक्रम आहे.
हे सर्व शमीने वेगवान गोलंदाज मनोज तिवारीबरोबर (Manoj Tiwari) झालेल्या इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये सांगितले.
“ज्यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये सामना व्हायचा, तेव्हा भारताकडून झहीर गोलंदाजीला आला की मी त्याला पाहत बसायचो. तसेच सामना पाकिस्तानविरूद्ध असला तरी मला अक्रमचीही गोलंदाजी खूप आवडायची,” असे शमी या सेशनदरम्यान म्हणाला.
शमी पुढे म्हणाला की, “जेव्हा मी मोठा होत होतो, तेव्हा मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दिग्गज सामने पाहत होतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिकेटचा महान खेळाडू आहे. सचिनला पाहुनच मी मोठा झालो आहे. त्या काळची सर्वात चांगली जोडी म्हणजे विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि सचिनची होती. जेव्हा फलंदाजीबद्दल चर्चा होते, तेव्हा नेहमीच सचिन आणि सेहवाग माझ्या डोळ्यासमोर येतात.”
यानंतर शमीला झहीर खानकडूनही खूप काही शिकायला मिळाले. कारण हे दोघेही आयपीएल फ्रंचायझी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळत होते.
“झहीर भाई आणि मी एकत्र खूप सामने खेळलो नाही. परंतु जेव्हा मी त्याच्याशी चर्चा केली, त्यावेळी मला खूप मदत मिळाली. मी आयपीएलदरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलो, तेव्हा मला समजले की झहीर भाई खूप अनुभवी आहे. त्याच्याकडून मला फक्त नव्या चेंडूने गोलंदाजी कशी करायची, याबद्दल जाणून घ्यायचे होते,” असेही झहीरबद्दल बोलताना शमी म्हणाला.
शमी ज्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळत होता, तेव्हा त्याला अक्रमकडून खूप काही शिकायला मिळाले. कारण अक्रम केकेआरचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.
“जेव्हा मी केकेआर संघात आलो, तेव्हा मला क्रिकेटशी संबंधित काही गोष्टींची जाणीव झाली. मी अक्रमला लहानपणापासून टी.व्ही.वर पाहिले होते. परंतु केकेआर संघात आल्यानंतर मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. सुरुवातीच्या काही दिवसांसाठी मी त्याच्याशी चर्चा करण्याइतका सक्षम नव्हतो,” असेही अक्रमबद्दल बोलताना शमी यावेळी म्हणाला.
सध्या जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही आठवड्यांपासून भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यापूर्वी आयपीएलचे आयोजन २९ मार्चला होणार होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएल इतिहासात अनसोल्ड राहिलेले ३ महान भारतीय क्रिकेटपटू
-भारताबरोबर एशेससारखीच कसोटी मालिका होणार, हा देश होणार सहभागी?
-सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?