मंगळवारपासून (२० जुलै) भारतीय संघ विरुद्ध काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघात तीन दिवसीय सराव सामन्याला डरहॅम येथील चेस्टर-एल-स्ट्रीट येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यादरम्यान बुधवारी(२१ जुलै) एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. भारताच्या एका खेळाडूनेच दुसऱ्या भारतीय खेळाडूची विकेट घेतली.
खरंतर या सामन्यापूर्वी काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाचे काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्याने अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. त्याचमुळे काउंटी संघाने त्यांचा अंतिम ११ जणांचा संघ तयार करण्यासाठी भारतीय संघाकडे काही खेळाडूंची मागणी केली होती. त्यानुसार या सराव सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे दोन भारतीय खेळाडू काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाकडून खेळताना दिसत आहेत.
या सराव सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ९३ षटकांत सर्वबाद ३११ धावा केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने १०१ धावांची, तर जडेजाने ७५ धावांची खेळी केली. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाची सुरुवात फारशी बरी झाली नाही. त्यांनी १० षटकांच्या आतच २४ धावांवर पहिल्या २ विकेट्स गमावल्या.
त्यानंतरही तिसरी विकेट वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात त्यांनी १३ व्या षटकात गमावली. विशेष म्हणजे सुंदरला भारताच्या मोहम्मद सिराजने केवळ १ धावेवर बाद केले. सिराजने गुडलेंथवर टाकलेल्या एका उसळत्या चेंडूवर सुंदर स्लीपमध्ये रोहित शर्माकडे झेल देऊन ७ चेंडूत १ धाव करुन बाद झाला. त्यामुळे काउंटी संघाची अवस्था ३ बाद २९ धावा अशी झाली.
त्याच्यापाठोपाठ काउंटी संघाचा कर्णधार विल ऱ्होड्सदेखील ११ धावांवर उमेश यादव विरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला. असे असले तरी काउंटी संघाचा सलामीवीर हसीब हमीदने शतकी खेळी करत डाव सांभाळला.
He gets @BCCI team-mate Sundar 😬
Live stream ➡️ https://t.co/KWauz1AJvx#CountyXIvIndia pic.twitter.com/nGHB89gvT4
— Durham Cricket (@DurhamCricket) July 21, 2021
सराव सामना खेळताना आवेश खान दुखापतग्रस्त
सराव सामन्यात काउंटी संघाकडून खेळत असलेला भारतीय वेगवान गोलंदाज आवेश खान दुखापतग्रस्त झाल्याने या सामन्यातून बाहेर गेला आहे. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला हनुमा विहारीने फलंदाजी करताना मारलेला चेंडू लागला लागला आहे. त्यामुळे त्याचा अंगठा फ्रॅर्चर झाला आहे. त्यामुळे आता तो केवळ सराव सामन्यातूनच नाही तर अगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर पडल्याची शक्यता आहे.
रोहित करतोय नेतृत्व
मंगळवारपासून सुरु झालेल्या सराव सामन्यात रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करत आहे. कारण नियमित कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हे हलक्याशा दुखापतींचा सामना करत असल्याने या सामन्यात सहभागी नाहीत. तर आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा डरहॅममध्ये सराव सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकदम झक्कास! श्रीलंकेविरुद्ध विनिंग शॉटचा फोटो शेअर करत चाहरने लिहिली मन जिंकणारी पोस्ट; म्हणाला…
धक्कादायक! हाँगकाँग क्रिकेट संघाच्या कर्णधाराला पोलिसांनी केली अटक, ‘हे’ आहेत आरोप