आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले होते.
केएल राहुलने झळकावले शानदार शतक
या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने शानदार शतक झळकावले. त्याने ६९ चेंडूंचा सामना करताना तडाखेबंद नाबाद १३२ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ षटकार व १४ चौकारांचा वर्षाव केला.
आरसीबीविरुद्ध झाले आठवे शतक
रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाविरुद्ध आयपीएलमध्ये फलंदाजांनी केलेले हे आठवे शतक होते. याचबरोबर आयपीएलमध्ये एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमाची बरोबरी झाली आहे. यापुर्वी हा नकोसा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर होता. आता आरसीबीने याच विक्रमाची बरोबरी केली आहे.
केएल राहुलचे आयपीएलमधील दुसरे शतक
केएल राहुलचे हे आयपीएलमधील दुसरे शतक ठरले. राहुलपुर्वी केवळ ५ भारतीयांनी असा पराक्रम केला आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये तब्बल ५ शतके केली आहेत. तर विरेंद्र सेहवाग, मुरली विजय, अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांनी प्रत्येकी २ शतके केली आहेत. आता राहुलचे नाव या दिग्गजांच्या यादीत सामील झाले आहे.