भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी संचलित धोनी क्रिकेट अकादमीची नवीन केंद्र सुरु होत आहेत. एमएस धोनी क्रिकेट अकादमीने विस्तार करण्याच्या दृष्टीने तीन राज्यांमध्ये आपल्या नवीन शाखा सुरु करण्याचे ठरवले आहे. त्या अंतर्गत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये आता लवकरच एमएस धोनी क्रिकेट अकादमीचा शुभारंभ होईल.
जगभरात खेळाच्या मुलभूत प्रशिक्षणावरील वाढता भर पाहून एमएस धोनीच्या आरका स्पोर्ट्स मॅनेजमेंट या कंपनीने ब्रेनिक्स बी या कंपनीसह भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागीदारी अंतर्गत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये क्रिकेट अकादमी सुरु करण्यात येईल. या ठिकाणी (बंगलोर वगळता) युवा खेळाडूंना खेळाचे मुलभूत प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांकडून दिले जाईल. तसेच आवश्यक त्या सुविधाही पुरवल्या जातील.
आरका स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मिहीर दिवाकर याबाबत बोलताना म्हणाले, “तीन राज्यांमध्ये एमएस धोनी क्रिकेट अकादमी सुरु करण्याच्या दृष्टीने आरका स्पोर्ट्स मॅनेजमेंटने ब्रेनिक्स बी या कंपनीसह भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेनिक्स बीकडे आम्ही एक विश्वासू भागीदार म्हणून पाहत आहोत. आणि आमच्या या भागीदारीने या तीनही राज्यांमधील मुलांना आम्ही सर्वोच्च स्तरावरच्या खेळासाठी तयार करू, असा आमचा विश्वास आहे.”
तसेच “सहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या एमएस धोनी क्रिकेट अकादमीचे आज संपूर्ण भारतभारत एकूण ५० केंद्र सुरु झाले आहेत. तसेच तीन केंद्र परदेशातही सुरु करण्यात आले आहेत. यात ५००हून अधिक प्रशिक्षक कार्यरत आहेत. मुले आणि मुली, असे दोन्हीही या अकादमीत प्रशिक्षण घेतात. आत्तापर्यंत जवळपास १०,००० खेळाडूंनी या अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे”, असेही दिवाकर यांनी यावेळी सांगितले.
या भागीदारीबद्दल बोलताना ब्रेनिक्स बीचे संचालक विनोद कुमार म्हणाले, “या भागीदारीसाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत. खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आणि सर्वोत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
याआधी काही महिन्यांपूर्वीच एमएस धोनी क्रिकेट अकादमीची एक शाखा पुण्यातही सुरु करण्यात आली होती. युवा खेळाडूंना आपल्यातील गुणवत्तेला वाव देण्याची सुयोग्य संधी ही अकादमी निर्माण करून देत आहे.
महत्वाच्या बातम्या:
INDvsENG 2nd Test Live: रहाणेचे अर्धशतक पूर्ण तर रोहित दिडशतकाच्या जवळ; भारतीय संघाच्या २०० धावा पार
रो-हिट मॅन शो इज ऑन..! इंग्लिश गोलंदाजांना चोप-चोप चोपलं, रोहितचं शानदार शतक; पाहा सेलिब्रेशन
मोईन अलीच्या जबरदस्त चेंडूने स्टंप्सचा भुगा, स्वत: विराट कोहलीही अवाक्; पाहा भन्नाट व्हिडिओ