इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या विजेत्या संघाचे नाव जाणून घेण्याची सर्वांनाच आतुरता लागून आहे. शुक्रवार रोजी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबई येथे यंदाच्या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे. ३ वेळचा आयपीएल विजेता चेन्नई संघ आणि २ वेळा चषक उंचावणारा कोलकाता संघ, या दोन्हीही संघांनी या हंगामात प्रभावी प्रदर्शन केले आहे. तसेच त्यांचे खेळाडूही चांगल्या लयीत आहेत. त्यामुळे चषक जिंकण्यासाठी होणारी ही लढत सामना दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन करेल.
या महामुकाबल्यात बऱ्याचशा खेळाडूंच्या निशाण्यावर काही विक्रमही असतील. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा सुद्धा या सामन्यासाठी मैदानावर उतरताच मोठा किर्तीमान आपल्या नावावर करेल.
कर्णधाराच्या रुपात धोनीचा हा ट्वेंटी ट्वेंटी स्वरुपातील तब्बल ३०० वा सामना असेल. अर्थातच कोलकाताविरुद्धच्या अंतिम सामन्यातून धोनी त्याच्या ट्वेंटी ट्वेंटी स्वरुपातील सामना नेतृत्त्वांचे त्रिशतक पूर्ण करेल. ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव कर्णधार असेल. त्याने आतापर्यंत २९९ ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका बजावली आहे. त्यापैकी तब्बल १७६ सामने जिंकण्यात त्याला यश आले आहे. तर ११८ सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यादरम्यान तो भारतीय टी२० संघ, चेन्नई सुपर किंग्ज, राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि इंडियन्स या संघांचा संघनायक राहिला आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई संघाने ३ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर याच संघाला त्याने टी२० चँपियन्स लीगमध्ये २ वेळा विजेते बनवले आहे. याखेरीज त्याच्या खात्यात आयसीसीची टी२० विश्वचषक ट्रॉफीही जमा आहे.
त्यामुळे हा महत्त्वपूर्ण सामना अविस्मरणीय बनवण्याकडे धोनीचा कल असेल. चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यातील आकडेवारी पाहता, चेन्नईचेच पारडे जड दिसते. त्यामुळे चेन्नईने हा सामना जिंकण्याच्या दाट शक्यताही आहेत. अशात धोनी त्याचा ३०० वा ट्वेंटी ट्वेंटी सामना विजयासह संपवतो की पराभवासह, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल की ऋतुराज? कोण उंचावणार आपली पहिली आयपीएल ट्रॉफी; पाहा आतापर्यंतची कामगिरी
‘हा एक हृदयद्रावक शेवट’, आयपीएल ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचूनही पराभूत झाल्यानंतर रिषभ झाला भावूक
सीएसके आणि आयपीएल जेतेपदाच्या आड येऊ शकतात केकेआरचे फॉर्मात असलेले ‘हे’ ४ शिलेदार