भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेविरुद्ध भारतीय संघाची आधीच घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेक प्रमुख खेळाडूंचा सामवेश आहे. पण आयपीएलमध्ये केकेआर संघासाठी ट्राॅफी जिंकवून देणाऱ्या श्रेयस अय्यरची बांग्लादेशविरुद्ध मालिकेतील चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियात निवड झाली नाही. सध्या अय्यर दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ड संघाचे नेतृत्व करत आहेत. दुलीप ट्रॉफीमध्ये अय्यरच्या बॅटमधून विशेष काही दिसले नाही. दरम्यान आता बीसीसीआयचा नवा आदेश समोर आला आहे. ज्यामध्ये अय्यरला सध्या भारतीय कसोटी संघात स्थान नसल्याचे सांगण्यात आले आहे.
श्रेयस अय्यरबद्दल टेलिग्राफशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सध्या श्रेयसला कसोटी संघात स्थान नाही. तो कोणाची जागा घेणार? याशिवाय दुलीप ट्रॉफीमध्ये त्याच्या शॉटची निवड हा चिंतेचा विषय ठरला आहे. तो खेळपट्टीवर सेट झाला होता पण नंतर अचानक त्याने हा शॉट खेळला. जेव्हा तुम्ही सेट असता आणि सपाट ट्रॅकवर फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला त्या संधीचा सर्वोत्तम उपयोग करणे आवश्यक आहे.”
टीम इंडियाने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. अय्यर मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत खेळताना दिसला होता. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये अय्यरने विशेष खेळी केली नाही. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. अय्यर आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतही खेळताना दिसला होता.
श्रेयस अय्यरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 24 डावात त्याने 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. या दरम्यान अय्यरने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 2021 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले होते.
हेही वाचा-
भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेसाठी समालोचकांची यादी जाहीर; अनेक दिग्गजांचा समावेश
सूर्यानंतर टी20 संघाचे कर्णधारपद कोणाला? दिग्गजाने उघड केले ‘नेक्स्ट सुपरस्टार’चे नाव
गोल्डन बॉय नीरज चोप्राची शस्त्रक्रिया यशस्वी; फ्रॅक्चर हाताने खेळली होती डायमंड लीग