आयपीएल २०२० ला १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात झाली. कोरोना विषाणूमुळे प्रेक्षकांच्या अनुपस्थित हे सामने खेळले जात आहेत. आयपीएलचे एवढी लोकप्रियता आहे की, चाहते टेलिव्हिजन किंवा मोबाइलवर सामान्यांचा आस्वाद घेत आहेत.
पण अशातच एक दुर्दैवी घटना घडली. आयपीएल स्पर्धेचा एक सामना पाहताना उत्तेजित होऊन भान हरपल्याने एका तीन मजली इमारतीवरून पडून ओडिशामधील एका पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला.
ओडिशा विशेष सशस्त्र पोलिस दलाचा (ओएसएपी) एक हवालदार मंगळवारी आपल्या मोबाइलवर एक आयपीएल सामना पाहत होता. तो हवालदार उत्तेजित झाला आणि त्याचा तोल गेल्याने पोलिस बॅरिकेड्सच्या तीन मजली इमारतीवरून थेट खालीच कोसळला. खाली पडताच तो हवालदार गंभीर जखमी झाला.
ही घटना ओडिशातील रायगडा जिल्ह्यातील चंडी भागात घडली. मृत्यू पावलेल्या या हवालदाराचे नाव योगेश्वर दास (२७) असे असून तो नबरंगूरचा रहिवासी आहे. तो सन २०१३ मध्ये कोरापुटमध्ये ओडिशा विशेष सशस्त्र पोलिस दलात (ओएसएपी) तिसऱ्या बटालियनमध्ये दाखल झाले होता. त्यांची पाच महिन्यांपूर्वीच रायगडा जिल्ह्यात बदली झाली होती.
माध्यमांतील वृत्तानुसार, योगेश्वर दास मंगळवारी संध्याकाळी बॅरिकेड्सच्या छतावर बसून आपल्या मोबाइलवर आयपीएल सामना पाहत होता. सामना सुरू असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो छतावरून खाली कोसळला. गंभीर जखमी झालेला योगेश्वर दास याला त्यांच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्या शरीरातून जास्त रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात जात असतानाच प्रवासादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.