fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ओळख एशिया कप २०१८ मधील ‘अ’ गटाची

आजपासून(15 सप्टेंबर) 14 वी एशिया कप स्पर्धा सुरु होणार आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेची सुरुवात साखळी फेरीपासून होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघाची ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

यातील अ गटाची थोडक्यात ओळख-

अ गटातील संघ- भारत, पाकिस्तान आणि हाँग काँग

असे होतील साखळी फेरीतील अ गटाचे सामने-

16 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध हाँग काँग – दुबई

18 सप्टेंबर – भारत विरुद्ध हाँग काँग – दुबई

1 9 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई

ओळख संघाची-

भारत – एशिया कप स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघ हा सर्वाधिक यशस्वी संघ आहे. आत्तापर्यंत भारताने 6 वेळा या एशिया कपचे विजेतेपद मिळवले आहे. यात 2016 ला टी20 प्रकारात झालेल्या एशिया कपच्या विजेतेपदाचाही समावेश आहे.

त्याचबरोबर भारताने 1984 ला झालेला पहिला एशिया कपही जिंकला आहे. तसेच त्यानंतर 1988, 1990-91, 1995 आणि 2010 या वेळी विजेतेपद मिळवले आहे.

आत्तापर्यंत 13 एशिया कप स्पर्धेपैकी 12 वेळा भारतीय संघ सहभागी झाला आहे. फक्त 1986 ला राजकीय मतभेदांमुळे भारताने एशिया कपमधून माघार घेतली होती. भारताची एशिया कपमधील विजयाची सरासरी ही 50 टक्के आहे.

यावर्षीच्या एशिया कपमध्ये भारताचे नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहित शर्मा करणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याने आत्तापर्यंत 3 वनडे द्विशतके केली आहेत.

भारतीय संघात चांगले अष्टपैलू खेळाडू असून फलंदाजांची फळी मजबुत आहे. तसेच दुबई आणि अबुधाबीच्या खेळपट्टीवर रिस्ट स्पिनर्स कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच एमएस धोनी सारखा अनुभवी फलंदाजही भारताकडे आहे.

तसेच मागील काही महिन्यांपासून भारतीय गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताचे गोलंदाज या स्पर्धेतमध्येही लयीत असतील.

असा आहे भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल.

पाकिस्तान- एशिया कपमध्ये पाकिस्तानने आत्तापर्यंत दोन वेळा विजेतेपद मिळवले आहे. यात 2000 मध्ये श्रीलंकेला पराभूत करुन तर 2012 मध्ये बांगलादेशला पराभूत करत त्यांनी ही विजेतीपदे जिंकली आहेत.

त्याचबरोबर मागील वर्षीच पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे एशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल.

जर योजनेनुसार त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी केली तर ते कोणत्याही संघाला वरचढ होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांचा फखर जमान हा फलंदाज तुफान फॉममध्ये आहे.त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. तो पाकिस्तानचा वनडेत द्विशतक करणारा पहिला आणि एकमेव फलंदाजही आहे.

याबरोबरच त्याला भक्कम साथ देण्यासाठी बाबर आझम, इमाम उल हक, शोएब मलिक सर्फराज अहमद हे फलंदाज आहे. तर शादाब खान हा फिरकी गोलंदाज संघात आहे. तसेच मोहम्मद अमीर, हसन अली आणि पहिल्यांदाच पाकिस्तान संघात संधी मिळालेला शाहिन आफ्रिदी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल.

असा आहे पाकिस्तानचा संघ-

सर्फराज अहमद (कर्णधार), फकार जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शान मसूद, शोएब मलिक, हरीस सोहेल, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, जुनैद खान, उस्मान खान, शाहीन अफ्रिदी, आसिफ अली , मोहम्मद अमीर.

हाँग काँग- एशिया कप 2018 मध्ये हाँग काँग चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल. त्यांना 2004 आणि 2008 मध्ये खेळलेल्या एशिया कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता.

2008 मध्ये यावर्षीप्रमाणेच त्यांचा भारत, पाकिस्तानसह एकाच गटात समावेश करण्यात आला होता. 2008 मध्ये भारताकडून 256 आणि पाकिस्तानकडून 155 धावांनी त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

असे असले तरी यावेळेस हाँगकाँगला त्यांच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल. त्यांच्याकडे उत्तम फिरकी गोलंदाज आणि मध्यमगती गोलंदाजांचे मिश्रण आहे. यात तन्वीर अफजल, एजाज खान आणि एहसान नवाज यांसारखे वेगवान गोलंदाज तर नदीम अहमद आणि एहसान खान सारखे फिरकीपटू आहेत.

परंतू फलंदाजी ही हाँग काँगची कमकुवत बाजू आहे. तरीही 20 वर्षीय अंशुमन रथ आणि बाबर हयात हे फलंदाज धावा करण्यास उत्सुक आहेत. मात्र त्यांना भक्कम साथ देण्यासाठी दुसऱ्या बाजूला कमकुवत फलंदाजी आहे.

असा आहे हाँग काँगचा संघ- 

अंशुमन रथ (कर्णधार), आयझ खान, बाबर हयात, कॅमेरॉन मॅकअल्सन, क्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाज, अरशद मोहम्मद, किनचिट शाह, नदीम अहमद, निजाकत खान, राघ कपूर, स्कॉट मॅकेकनी, तन्वीर अहमद, तन्वीर अफझल, वकास खान, आफताब हुसेन.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दोन वर्षानंतर पुन्हा धडाडणार स्टेनगन

म्हणून एमएस धोनीने सोडले कर्णधारपद

You might also like