जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या दिवशी तीन सामने खेळले गेले. अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यांमधील ‘टाय’ निकालामुळे गुणतालिकेत बरीच उलथापालथ पाहायला मिळाली.
बेंगलोर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी पहिला सामना यु मुंबा विरुद्ध युपी योद्धा असा झाला. अखेरच्या रेडपर्यंत गेलेला या सामन्यात निकाल लागू शकला नाही. पूर्ण वेळेनंतर हा सामना २८-२८ असा बरोबरीत सुटला. मुंबईचा कर्णधार फजल अत्राचली याने केलेल्या एका चुकीमुळे संघाला बरोबरीत समाधान मानावे लागले.
दिवसातील दुसऱ्या सामन्यात बेंगलोर बुल्स व तेलगू टायटन्स हे दक्षिणेतील संघ भिडले. बंगलोरसाठी नेहमीप्रमाणे पवन सेहरावत याने सर्वाधिक ८ गुण मिळवले. तर, तेलगू टायटन्सला प्रमुख रेडर सिद्धार्थ देसाई याची कमतरता जाणवली. तरीदेखील रोहित कुमार चे नेतृत्वातील तेलगू टायटन्सने सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.
दिवसातील तिसरा व अखेरचा सामनाही पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे अटीतटीचा झाला. दबंग दिल्ली व तमिल थलाइवाज या दोन तुल्यबळ संघातील सामन्यात पुन्हा एकदा बरोबरी पाहायला मिळाली.
दबंग दिल्लीचा स्टार रेडर नवीन कुमार याने सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये सुपर टेन लगावला.
दुसऱ्या हाफमध्ये ही सामन्यातील रंगत वाढली. संघ पिछाडीवर असताना तमिल थलाइवाजकडून कर्णधार सुरजित सिंग यानेेे सलग तीन वेळा सुपर टॅकल करत सामन्याला बरोबरीत आणले. मात्र, अखेरच्या पाच मिनिटात नवीन याला रिवाईव करण्यात दिल्लीच्या खेळाडूंना अपयश आले. मनजीतने अखेरच्या रेडमध्ये जोखीम न घेतल्याने दोन्ही संघांना बरोबरीवर समाधान मानावे लागले.