लहान वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे बरेच खेळाडू आहेत. इतकेच नाही तर बरीच वर्ष क्रिकेट खेळून नंतर निवृत्त झालेले खेळाडू देखील बरेच आहेत. परंतु जगात असा एक क्रिकेटपटू होता ज्याने वयाच्या ७२ वर्ष १९२ दिवस वय असताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ते भारताचेच क्रिकेटपटू होते आणि त्यांनी १९५० मध्ये कॉमनवेल्थ इलेव्हनविरुद्ध बॉम्बे गव्हर्नर्स इलेव्हनकडून पहिला सामना खेळला होता.
इतक्या जास्त वयात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूचे नाव होते राजा महाराजा सिंग. त्यांचा जन्म दि. १७ मे १८७८ रोजी कपूरथला (पंजाब) येथे झाला. एवढे जास्त वय असताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे ते जगातील एकमेव क्रिकेटपटू ठरले होते व आजही हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. तसेच भविष्यात मोडला जाण्याची शक्यताही फारच कमी आहे.
जेव्हा त्यांनी पदार्पण केले तेव्हा ते बॉम्बे इलेव्हन संघाचे कर्णधार होते. तर दुसरीकडे फ्रँक वॉरेल्स हे कॉमनवेल्थ इलेवन संघाचे कर्णधार होते. या दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतच खेळवला गेला.
या सामन्यात राजा महाराजा सिंग यांनी नवव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि ४ धावा केल्या. याशिवाय त्यांनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही केले नाही. सामन्याच्या दुसर्या डावात ते आजारापणामुळे अनुपस्थित राहिले.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या सामन्यानंतर ते दुसरा सामना कधीही खेळू शकले नाहीत. या सामन्याच्या पहिल्या डावात जिम लेकर (Jim Laker) यांनी त्यांची विकेट घेतली. त्यावेळी राजा महाराजा सिंग हे जिम लेकरपेक्षा ४४ वर्ष मोठे होते, म्हणजे त्यावेळी लेकरचे वय २८ वर्षे होते.
असे मानले जाते की क्रिकेटच्या इतिहासात अशी पहिलीच घटना होती, की जेव्हा एखाद्या गोलंदाजाने स्वतःच्या पेक्षा ४४ वर्षांनी मोठ्या वयाच्या खेळाडूला गोलंदाजी केली असेल.