आयपीएल 2020मध्ये झालेल्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू राहुल तेवतियाने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेले 224 धावांचे आव्हान राजस्थानने तीन चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. त्यात तेवतियाने 31 चेंडूत 53 धावा केल्या.
विशेष म्हणजे, वेगवान धावा करणारा फलंदाज संजू सॅमसन (42 चेंडू 85 धावा) 17 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर पंजाबने दिलेली मोठी धावसंख्या गाठणे अतिशय कठीण होते. अशा परिस्थितीत, तेवतिया खेळपट्टीवर टिकून राहिला.
तो वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला, सुरुवातीला त्याला फलंदाजी करणे कठीण जात होते. त्याच्या बॅटचा आणि चेंडूचा योग्य संपर्कच होत नव्हता. त्यावेळी चाहत्यांनी आणि क्रिकेट तज्ज्ञांनी त्याच्यावर टीका केली. पण वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याने फेकलेल्या 18 व्या षटकात त्याने तब्बल 5 षटकार ठोकले आणि टीकाकारांना शांत केले. तेवतियाच्या पावलांवर पाऊल ठेवत जॉफ्रा आर्चरने पुढच्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या मोहम्मद शमीच्या दोन चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले. यानंतर, शेवटच्या षटकात टॉम करनने चौकार मारला व राजस्थानला सामना जिंकून दिला.
स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने मोठ्या धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठण्याचा विक्रम नोंदवला.
तेवतियाच्या या धडाकेबाज फलंदाजीनंतर इंटरनेटवर त्याचे कौतुक होत आहे. ट्विटरवर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तेवतियाच्या या खेळीनंतर राजस्थान रॉयल्स संघानेही त्याचा सन्मान म्हणून सोमवारी त्यांचे ट्विटर बायो बदलले आहे.