गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२२चा ४०वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. गुजरातकडून फिरकीपटू राशिद खान याने विजयी षटकार मारत संघाला हंगामातील सातवा सामना जिंकून दिला. या सामन्यानंतर आपण फलंदाजीवर केलेली मेहनत कामी आली असल्याचे राशिदने म्हटले आहे.
गुजरातला (Gujrat Titans) शेवटच्या षटकात विजयांसाठी २२ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर राहुल तेवतियाने एक धाव घेतली. त्यामुळे तिसऱ्या चेंडूवर राशिद (Rashid Khan) स्ट्राईकवर आला. त्याने या चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर पुढील चेंडू डॉट गेल्यानंतर उर्वरित २ चेंडूंवर राशिदने सलग २ षटकार खेचले आणि संघाला शेवटच्या चेंडूवर ५ विकेट्सने विजय मिळवून (Rashid Khan Match Winning Six) दिला. राशिदने या सामन्यात ११ चेंडू खेळताना ४ षटकारांच्या मदतीने वैयक्तिक ३१ धावा केल्या.
आपल्या या सामना विजयी खेळीबद्दल बोलताना (Rashid Khan On His Batting) राशिद म्हणाला की, “मला खूप चांगले वाटत आहे. मला माझ्या फलंदाजीवर विश्वास होता आणि फिटनेसवरही की, मी मारू शकतो. मला आनंद आहे की, मी हैदराबादविरुद्ध असे प्रदर्शन करू शकलो.”
“मी माझ्या फलंदाजीवरील विश्वास कायम ठेवला. कारण गेल्या २ वर्षांपासून मी त्यावर मेहनत घेत होतो. जेव्हा शेवटच्या षटकात २२ धावा करायच्या होत्या, तेव्हा मी तेवतियाला म्हणालो की, आपल्या सर्वश्रेष्ठ गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने अंतिम षटकात २५ धावा दिल्या होत्या आणि आता आमची वेळ होती. एखादा चेंडू निर्धाव गेला, तरीही घाबरायचे नाही आणि सामना फिनिश करायचा आहे,” असेही राशिदने म्हटले.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १९५ धावा केल्या. यामध्ये हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या ६५ धावा आणि आणि ऍडेन मार्करमच्या ५६ धावांच्या खेळीचा समावेश होता. या डावात गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात गुजरातकडून सलामीवीर वृद्धिमान साहाने सर्वाधिक ६८ धावा केल्या. तसेच राहुल तेवतिया (नाबाद ४० धावा) आणि राशिद खानने शेवटी संघासाठी मॅच विनिंग खेळींचे योगदान दिले.
गुजरातचा पुढील सामना ३० एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आयपीएलमध्ये प्रथमच फलंदाजी करत असलेल्या शशांकची घातक बॉलर फर्ग्युसनविरुद्ध षटकारांची हॅट्रिक
राशिद खानने यान्सेनला षटकार खेचल्यानंतर चांगलाच भडकला मुरलीधरन; डगआऊटमध्येच घातला राडा
आधी हातावर लागला जोराचा चेंडू, नंतर स्वस्तात बाद झाला हार्दिक; मग काय पत्नी नताशाचे पडले तोंड