आयपीएलच्या या हंगामात झालेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर खेळलेल्या तीनही सामन्यात या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात गुणतालिकेत अव्वल स्थानी असणारा संघ या हंगामात शेवटच्या स्थानी असल्यामुळे संघाचा फिरकीपटूं रवींद्र जडेजाला दुःख झाले आहे.
चांगली कामगिरी करून येऊ शकतो वरच्या स्थानी
समालोचक आकाश चोप्रा यांनी रवींद्र जडेजाला संघाच्या सद्यस्थितीबद्दल विचारले असता तो म्हणाला,” चेन्नई संघाला गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर पाहून दुःख वाटते. संघासाठी ही चांगली बाब नाही. पण आयपीएलमध्ये तळाशी असलेला संघ चांगली कामगिरी करून गुणतालिकेत वरच्या स्थानावर येऊ शकतो.”
फिरकीपटूंना मिळाली नाही मदत
जडेजाला त्याच्या कामगिरीबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, “मला असे वाटत होते की युएईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल आणि चेंडू वळेल; पण इथे अद्याप असं पाहायला मिळालेलं नाही. तथापि, मला आशा आहे की ही स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसतसे फिरकीपटूंना मदत मिळेल.”
गोलंदाजीत चांगली कामगिरी करण्यात ठरला अपयशी
रवींद्र जडेजाने आयपीएल 2020 मध्ये गोलंदाजी करताना आतापर्यंत खूप खराब कामगिरी केली आहे. त्याने तीनही सामन्यांमध्ये 10 पेक्षा जास्तच्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध 44, राजस्थानविरुद्ध 40 तर मुंबईविरुद्ध 42 धावा दिल्या आहेत. आतापर्यंत त्याला अवघ्या 2 विकेट्स मिळाल्या आहेत. मात्र, फलंदाजीत त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतक केले होते. आता जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.