वनडे क्रिकेटचे सामने ७ तास चालतात. यात दोन्ही संघांना एक फलंदाजी व एक डाव गोलंदाजी करण्याची संधी मिळते. यामुळे खऱ्या अर्थाने जे खेळाडू स्पेशलिस्ट असतात त्यांना तीन साडेतीन तासांत चांगली कामगिरी करायची असते तर अष्टपैलू खेळाडूंना पुर्ण सामन्यात ही संधी असते.
जो खेळाडू त्या ७ तासांत चांगली कामगिरी करतो त्याला मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर पुरस्कार दिला जातो. सामनावीर पुरस्कार हा एकप्रकारे त्या खेळाडूच्या चांगल्या कामगिरीला दिलेले बक्षीसच असते.
आज या लेखात वनडे सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंची आपण चर्चा करणार आहोत.
५. रिकी पाॅटींग (३२ सामनावीर पुरस्कार)
ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज व कर्णधार रिकी पाॅटींगने वनडेत ३७५ सामन्यांत ३२वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. त्याने तब्बल दोन वेळा ऑस्ट्रेलिया संघाला विश्वविजेतेपद जिंकून देताना संघाचे नेतृत्त्व केले आहे. या ३७५ सामन्यांपैकी तब्बल २६२ सामन्यांत पाॅटींग संघात असताना ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. जगात सर्वाधिक वनडे सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कसोटी प्रमाणेच वनडेत तो अव्वल स्थानी आहे.
४. जॅक कॅलिस (३२ सामनावीर पुरस्कार)
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने वनडे क्रिकेटमध्ये ३२८ सामन्यांत ३२ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. कॅलिसने क्रिकेटमध्ये गोलंदाजी व फलंदाजी अशा दोन्ही विभागात जबरदस्त कामगिरी करत हे सामनावीर पुरस्कार मिळवले आहे. या ३२८ सामन्यांपैकी तो संघात असताना दक्षिण आफ्रिकेने २१० सामने जिंकले आहेत.
३. विराट कोहली (३६ सामनावीर पुरस्कार)
वनडेत २४८ सामन्यांत विराटला ३६वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. यातील ९ सामन्यात विराटला फलंदाजीची संधीही मिळाली नाही. यामुळे जवळपास ६.६८ सामन्यानंतर किंवा ६.६३ डावानंतर विराटला हा पुरस्कार मिळाला आहे. विराट संघात असताना भारताने २४८ पैकी १५० वनडे सामने जिंकले आहेत. केवळ २४८ सामन्यांत ३६ सामनावीर जिंकणारा तो जगातील एकमेव क्रिकेटर आहे.
२. सनथ जयसुर्या ( ४८ सामनावीर पुरस्कार)
दुसऱ्या क्रमांकावर या यादीत श्रीलंकेचा सनथ जयसुर्या असून ४४५ सामन्यांत ४८ वेळा त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक ९.२७ सामन्यानंतर त्याने हा कारनामा केला आहे. जयसुर्या संघात असताना लंकेने २२३ सामन्यांत विजय मिळवला आहे.
१. सचिन तेंडूलकर (६२ सामनावीर पुरस्कार)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ४६३ वनडे सामन्यांत तब्बल ६२ वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. जवळपास ७.५ सामन्यांनंतर सचिन कायमच संघातील टाॅप परफाॅर्मर अर्थात सामनावीर राहिला आहे. सचिन जरी जगात सर्वाधिक वनडे खेळला असला तरी सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मात्र तो रिकी पाॅॅटींग (२६२) व माहेला जयवर्धनेनंतर (२४१) तिसऱ्या स्थानावर आहे. सचिन संघात असताना टीम इंडियाने २३४ सामन्यांत विजय मिळवला आहे.
मजेशीर आकडेवारी-
वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू व्हिव्हीयन रिचर्ड यांनी १८७ सामन्यांत तब्बल ३१वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. रिचर्ड यांनी फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्हीतही चांगली कामगिरी केली होती. १८७ सामन्यांत त्यांना १६७ वेळा फलंदाजी तर १३१वेळा गोलंदाजी मिळाली. त्यांचे सर्व सामनावीर पुरस्कार जर फलंदाजीतील समजले तर प्रत्येकी ५.३८ डावांनंतर किंवा प्रत्येकी ६ सामन्यानंतर त्यांना सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. याच कारणामुळे त्यांना आजही जगातील वनडेचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटर कदाचीत म्हणत असतील.
आकडेवारीवर आधारीत काही मनोरंजक लेख-
–टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी
–सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच
–टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब
–टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू