भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत खेळायचा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात संघ व्यवस्थापन आणि कर्णधार आणि प्रशिक्षक प्लेइंग इलेव्हन निवडताना खूप विचार करतील. या प्लेइंग इलेव्हनची उत्सुकता चाहत्यांना देखील आहे. कारण संघात रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकसारखे गुणवंत यष्टीरक्षक आहेत. माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाच्या मते या दोघांपैकी एकाला संघात नक्कीच घेतले पाहिजे, कारण तो संघासाठी एक्स फॅक्टर (निर्णायक प्रदर्शन करणारा) ठरू शकतो.
सुरेश रैना (Suresh Raina) भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक आहे. त्याने संघासोबत अनेक महत्वाचे सामने आणि मालिका जिंकल्या आहेत. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हा प्रश्न चाहत्यांना मागच्या मोठ्या काळापासून सतावत आहे. कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तर दुसरीकडे पंत मात्र टी-20 फॉरमॅटमध्ये अद्याप स्वतःची चमक दाखवू शकला नाहीये. पाकिस्तानविरुद्धही कार्तिकलाच प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रधान्य मिळेल, असे सांगितले जात आहे. पण रैनाच्या मते पंत संघासाठी एक्स फॅक्टर ठरेल, कारण तो डावखुरा फलंदाज आहे. हा मुद्दा पटवून देताना रैनाने गौतम गंभीर आणि युवराज सिंगचे उदारहण दिले, ज्यांनी भारतासाठी विश्वचषक स्पर्धेत चांगली महत्वाची भूमिका पार पाडली होती.
माध्यमांशी बोलताना रैना म्हणाला की, “दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याने चांगले प्रदर्शनही केले आहे. पण जर रिषभ पंत संघात असेल, तर तो तुमच्यासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. तो एक डावखुरा फलंदाज. आम्ही पाहिले की, गौतम गंभीर 2007 टी-20 विश्वचषकात कसा खेळला होता. युवराजनेही सहा षटकार मारले होते. नंतर 2011 विश्वचषकातही या दोघांची भूमिका महत्वाची होती. त्यामुळे मला वाटते डावखुरा फलंदाज असल्यामुळे त्यांना हा फायदा मिळतो. पंतला माहितीये पहिल्या चेंडूवर षटकार कसा मारायचा. जर त्याला संधी मिळाली, तर तो नक्कीच चांगले प्रदर्शन करेल.”
दरम्यान, भारतीय संघाने विश्वचषक अभियानाची सुरुवात करण्याआधी सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. भारताचा पहिला सराव सामना जयमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता, जो संघाने 6 धावांच्या अंतराने जिंकला. तर दुसरा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होता. परंतु पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
खूप होत आहे टीका, पण सुरेश रैना म्हणतोय, “त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्याच”
शाहीन आफ्रिदीला सोडा, ‘हा’ गोलंदाज देऊ शकतो भारताला टेन्शन; माजी दिग्गजाने केले सावध






