दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या नवीन कर्णधार क्विंटन डी कॉकबरोबर भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात येणार आहे. यातील पहिला सामना 12 मार्चला धरमशाला येथे होणार आहे.
या सामन्यापूर्वी कर्णधार डी कॉकने (Quinton De Kock) भारताविरुद्ध वनडे मालिकेबद्दल बोलताना आपले मत स्पष्ट केले आहे. यावेळी डी कॉक म्हणाला की, या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिस, तो स्वत: आणि डेव्हिड मिलर या अनुभवी खेळाडूूंना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तसेच वरिष्ठ खेळाडूंना युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.
माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) गुरुवारपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे डी कॉक म्हणाला.
“फाफ पुनरागमन करत आहे. एक कर्णधार म्हणून त्याने संघासाठी आणि आमच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो या मालिकेत युवा खेळाडूंच्या मदतीसाठी आहे. या मालिकेत डू प्लेसिसचा अनुभव आमच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल,” असे डू प्लेसिसबद्दल बोलताना डी कॉक म्हणाला.
डी कॉक पुढे म्हणाला की, “आम्हाला माहिती आहे की, आम्ही या परिस्थितीत कमी अनुभव असलेल्या संघाबरोबर या दौऱ्यावर आलो आहोत. परंतु हे महत्त्वाचे आहे की डू प्लेसिस, मी आणि डेव्हिड मिलर (David Miller) आपला अनुभव वापरून या युवा खेळाडूंची मदत करू.”
डू प्लेसिसला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी विश्राम देण्यात आला होता. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ही मालिका 3-0च्या मोठ्या फरकाने जिंकली होती. यावेळी डी कॉक म्हणाला की, “डू प्लेसिसला विश्रांती देण्यात आली होती. कारण तो अनेक दिवसांपासून खेळत होता. त्यासाठी त्याला विश्रांती देणे गरजेचे होते.”
“मला खूप आनंद होतोय की तो पुन्हा संघाबरोबर जोडला आहे. आम्ही आता निर्णय घेतलेला नाही की तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल. यावर आम्ही नंतर निर्णय घेणार आहोत,” असे डू प्लेसिसबद्दल बोलताना डी कॉक म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात शानदार विजय मिळवल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाचा आत्मविश्वास वाढला आहे, असे कर्णधार डी कॉक म्हणाला.
“भारतीय संघ (Team India) अविश्वसनीय संघ आहे. त्यांचा संघ खूप संतुलित आहे. परंतु आम्ही मनोबल वाढवून येथे पोहोचलो आहोत,” असेही भारतीय संघाबद्दल बोलताना डी कॉक म्हणाला.
यावेळी आपल्या खेळाडूंबद्दल बोलताना डी कॉक म्हणाला की, “ब्यूरॉन हेंड्रिक्स दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेत आजारी पडला होता. परंतु तो आता निवडीसाठी उपलब्ध आहे. तसेच मला असे वाटते की, तेंबा बाऊमा या सामन्यासाठी तयार होईल. परंतु मी निश्चितपणे सांगू शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
-“भारताला भारतातच पराभूत करणे अशक्य”
–कोरोनामुळे महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातून आयपीएलचे सामने ढकलणार पुढे?
–आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामन्यांनाही बसला कोरोनाचा जोरदार फटका!






