सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवारी (०८ मार्च) २०२६ टी-२० वर्ल्ड कपचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे. मात्र, शेजारील देश पाकिस्तानात सर्वत्र शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. पाकिस्तानचे अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञ टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये न्यूझीलंड जिंकेल असे भाकीत करत होते, पण विजय भारताचा झाला. भारताच्या या विजयामुळे शोएब अख्तरचा चांगलाच जळफळाट झाला आहे.
सामन्यानंतर अख्तर म्हणाला की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने क्रिकेट उद्ध्वस्त केले आहे. याशिवाय अख्तरने भारतीय क्रिकेट बोर्डाची तुलना एका श्रीमंत मुलाशी केली, जो गरिबांना बोलावून आपली ताकद दाखवतो.
पाकिस्तानच्या ‘गेम ऑन है’ या शोमध्ये बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “हे काहीसे एखाद्या गल्लीतील श्रीमंत मुलासारखे आहे, जो सर्व गरीब मुलांना बोलावतो आणि म्हणतो, ‘चला क्रिकेट खेळूया.’ भारत आपल्यासोबत नेमके हेच करत आहे. आठ संघांपैकी ते चार संघ ठेवतात आणि त्या चारपैकी पुन्हा तिघांना बोलावतात आणि पुढे जातात. मग ते म्हणतात, ‘बघा, मी जिंकलो.’ त्यांनी संपूर्ण क्रिकेट बरबाद केले आहे.”
विशेष म्हणजे, टीम इंडियाने गेल्या २ वर्षांत सलग तीन ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले होते. त्यानंतर ‘मेन इन ब्लू’ने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला. ही ट्रॉफी देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच आली होती. आता २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला आहे.
अशा प्रकारे ‘मेन इन ब्लू’ने सलग ३ ट्रॉफींवर आपले नाव कोरले आहे. आता भारतीय संघ ही विजयी घोडदौड कुठपर्यंत कायम राखतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






