-आशुतोष रत्नपारखी
इंग्लंडकडे विक्रम मोडणारे खेळाडू कधीच नव्हते. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे महान खेळाडू नव्हते. तसे ते भरपूर होते, पण जगभरातील फलंदाज विविध विक्रम करत असताना इंग्रज कायम त्यापासून लांबच असायचे. म्हणजे वर्गातील हुशार हुशार मुलं-मुली एकत्र बसून अभ्यास करताना एखाद टोळकं असतं, जे काही फार हुशार नसतं पण अगदीच ढ सुद्धा नसतं. ते या मुलामुलींना अभ्यास करताना कसं बघते तसं किंवा वार्षिक गॅदरिंगला काही चुणचुणीत पोरं कशी डान्स वगैरे बसवतात आणि काहीजण लांबूनच बघतात, तशी इंग्लंडची जागतिक क्रिकेटमध्ये स्थिती होती.
अलिस्टर कूकचं पदार्पण अशाच काहीशा परिस्थितीत झालं. इंग्लंडची फलंदाजी हा तसा कधीच गौरवाचा विषय नव्हता, कूकने आपल्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकून तो थोडा बदलण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न तो पुढची बारा वर्षे करत राहिला. पदर्पणात शतक करणारा १६ इंग्लिश फलंदाज आणि दुसऱ्या डावात अर्धशतक अशी कामगिरी करणारा जगातील केवळ पाचवा फलंदाज. भारताच्या दौऱ्यावर त्यानं हा पराक्रम केला होता २००६ साली. यथावकाश त्याचा २२ वा वाढदिवस आला तोपर्यंत त्याची ४ शतके झाली होती, हे करणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू. क्रिकेटमध्ये असे अनेक पहिल्यांदाच कुठल्याही इंग्लिश फलंदाजांच्या केलेले नवनवीन विक्रम त्याने केले.
तो ९२ एकदिवसीय सामने खेळला असला तरी त्याचं मन रमले ते कसोटी क्रिकेटमधेच. वर्षांनुवर्षे तो सहजपणे असलं काहीतरी करत होता. अनेक अचंबित करणारे विक्रम त्याने केले. जसे की, भारतामध्ये ८६६ कसोटी धावा करणे. पहिला कर्णधार ज्याने पहिल्या पाच कसोटीत शतके केली, संघाच्या ५० कसोटी विजयात महत्वाचा घटक असणे, आशियात सर्वाधिक धावा करणारा आशियाबाहेरचा फलंदाज होणे. देशाकडून खेळताना- सर्वाधिक कसोटी शतके, सर्वाधिक धावा, सर्वाधिक कसोटीत नेतृत्व, कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके आणि सर्वात जास्त सलग कसोटी १५९ सामने खेळणे. असले थक्क करणारे अनेक विक्रम अलास्टरने केले आणि अगदी काही कळू न देता केले.
तो जवळपास प्रत्येक मालिकेमध्ये खोऱ्याने धावा ओढायचा. कुठल्याही प्रतिस्पर्ध्यापुढे असो, घरच्या मैदानावर असो किंवा परदेशात. २०१०-११ ची अशेस मालिकेत ७६६ धावा करत त्याने धुमाकूळ घातला. २०१३-१४ ची इंग्लंड मधली अशेस मालिका कर्णधार म्हणून त्याची पहिलीच. ती मालिका इंग्लंड ३-० ने जिंकले. लगेचच असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इंग्लंडने ४-१ने मानहानीकारक पराभव पत्करला. २०१५च्या अशेस मालिकेमध्ये इंग्लंडने ३-२ असा पुन्हा विजय मिळवला.
कसोटीत आघाडीला येऊन त्याने सर्वाधिक ९६०० धावांचा सुनिल गावस्कर यांचा विक्रम मोडला. ६०००, ७०००, ८०००, ९०००, ११००० आणि १२००० धावा करणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज, तसेच २०००, ३०००, ४०००, ५००० आणि ६००० धावा करणारा सर्वात तरुण इंग्लिश फलंदाज असे भन्नाट विक्रम त्यानं केलेत.
त्याच्यातल्या इंग्लिश जेंटलमनला तो कधीच स्वतः पासून लांब करत नाही. अर्थात हे त्याला शोभते, उगाच कोहलीला छानसं हसून शतकानंतर आनंद व्यक्त करताना आपल्याला बघायला आवडेल का? किंवा धोनीला दात विचकत मॅच जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना आपण पाहुही शकणार नाही. तसाच हा, शांत, एखाद्या समुद्रासारखा. पण उसळला की समोरचा संघ उध्वस्त झालाच म्हणून समजा. कसोटीत ३२ शतके करणारा हा मॉडर्न ग्रेट, कधीही आनंद व्यक्त करताना सभ्यता सोडत नसे. कुठेही आक्रस्ताळेपणा करत नसे, उगाच शिव्यांची लाखोली बाहत नसे, असलं काही तो कधीच करत नसे.
भारताविरुद्धची पाचवी कसोटी ही त्याची शेवटची मालिका होती. १२,४७२ धावा आणि ३३ कसोटी शतकानंतर हा कॅप्टन कूक थांबला. Tank is empty इतक्या सहज शब्दात त्यानं रिटायरमेंटबद्दल मत व्यक्त केले होते. ऑयन मॉर्गन, जो रूट वगैरे नवी पिढी आता सक्षम आहे हे लक्षात आलं त्याच्या आणि इंग्लिश क्रिकेटचं भविष्य योग्य हातात देऊन तो रिटायर होतोय.
क्रिकेटशिवाय शेती ही त्याची आवड आहे. त्यामुळे आता रिटायर झाल्यावर तो गमतीने म्हणला होता की मी आता शेती करणार आहे. बांगलादेशी आक्रस्ताळेपणाच्या या क्रिकेट युगात, सचिन द्रविड वगैरेंची सभ्यता पाळणारा आणि हा खेळ त्यासाठीच ओळखला जातो हे लक्षात आणून देणारा हा आधुनिक श्रेष्ठ आता रिटायर एकाद्या संघाला मार्गदर्शन करताना पाहयला नक्की आवडेल. संयम, शांतपणा, इंग्लिश मॅनर्सचा वस्तुपाठच जणू कूक होता.
वर्षानुवर्षे आपल्याला आकडेवारीचे गगनचुंबी राजमहाल बघायची सवय, तेव्हा ग्लुसेस्टरच्या या शेतकऱ्याचा आकडेवारीचा इंग्लिश बंगला बघताना सुखद आनंद मिळायचा, आहेच तसा तो टुमदार आणि ऐटबाज.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण