भारतात खेळला जात असलेला वनडे विश्वचषक 2023 आता फक्त एक सामन्याचा पाहुणा आहे. स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने खेळले गेले आहेत. तसेच, अंतिम सामना खेळणारे दोन संघही निश्चित झाले आहेत. ते संघ म्हणजेच भारत आणि ऑस्ट्रेलिया होय. असे असले, तरीही स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना संपताच एका स्टार खेळाडूची वनडे कारकीर्दही संपली आहे. या खेळाडूने स्पर्धेच्या सुरुवातीलाच घोषणा केली होती की, तो वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा संपल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेईल.
कोण आहे तो खेळाडू?
वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) संघात कोलकाताच्या इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 3 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याची वनडे कारकीर्दही संपुष्टात आली. डी कॉकने आधीच घोषित केले होते की, तो विश्वचषक 2023नंतर वनडे क्रिकेट खेळणार नाही. अशात आता तो वनडे क्रिकेट खेळताना दिसणार नाही. मात्र, तो टी20 क्रिकेट खेळणे सुरू ठेवेल.
डी कॉकची कारकीर्द
क्विंटन डी कॉक याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने जानेवारी 2013मध्ये न्यूझीलंडविरुद्ध बोलँड पार्क येथे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आतापर्यंत त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 155 वनडे सामने खेळले. यामध्ये त्याने 45.74च्या सरासरीने 6770 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 21 शतके आणि 30 अर्धशतके निघाली आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वी डी कॉकने 2021मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेकडून 54 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 38.82च्या सरासरीने 3300 धावा केल्या. यामध्ये 6 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे.
डी कॉकचे विश्वचषक 2023मधील प्रदर्शन
दुसरीकडे, क्विंटन डी कॉक याच्यासाठी विश्वचषक 2023 स्पर्धा खूपच यादगार राहिली. यामध्ये त्याने 10 सामने खेळले. यात त्याने 59.40च्या शानदार सरासरीने 594 धावा केल्या. यादरम्यान त्याने तब्बल 4 शतकेही झळकावली. (south africa wicket keeper batter quinton de kock retires from odi cricket after world cup 2023 semifinal)
हेही वाचा-
“या वयातही देशाची जर्सी घालून…”, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर ताहीर भावूक
आफ्रिकेची मजल उपांत्य सामन्यापर्यंतच, पाचव्यांदा सोडली फायनल खेळण्याची संधी