शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून नुकतीच उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडली आहे. पाहुण्या भारताने वनडे मालिकेत यजमान श्रीलंकेचा २-१ ने पराभव केला आहे. यानंतर आता सर्वांचे लक्ष आगामी टी२० मालिकेवर लागले आहे. येत्या रविवारी अर्थातच २५ जुलै रोजी टी२० मालिकेचा शुभारंभ होणार आहे.
वनडे मालिकेप्रमाणे २० षटकांच्या टी२० मालिकेतही ३ सामने खेळवले जाणार आहेत. एक दिवसाआड एक हे सामने रंगणार आहेत. २५ जुलै रोजी पहिला टी२० सामना झाल्यानंतर २७ जुलैला दुसरा आणि २९ जुलैला तिसरा व शेवटचा टी२० सामना होणार आहे. हे सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडणार आहेत. तसेच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता या सामन्यांना सुरुवात होईल.
श्रीलंका विरुद्ध भारत टी२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी२० सामना- रविवार, २५ जुलै (कोलंबो, रात्री ८ वाजता)
दुसरा टी२० सामना- मंगळवार, २७ जुलै (कोलंबो, रात्री ८ वाजता)
तिसरा टी२० सामना- गुरुवार, २९ जुलै (कोलंबो, रात्री ८ वाजता)
अशी झाली वनडे मालिका
तत्पुर्वी धवनच्या नेतृत्त्वाखालील नवख्या भारतीय संघाने वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. पहिल्या वनडे सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात दमदार कामगिरी करत भारताने श्रीलंकावर ७ विकेट्सने सोपा विजय मिळवला. १७९ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत अवघ्या २४ चेंडूत ४३ धावांची तूफानी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉला या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यानंतर पुढील दुसरा वनडे सामना चुरशीचा ठरला. हा सामना जिंकत मालिका बरोबरीत आणण्यासाठी श्रीलंका संघाने जोर लावला. फलंदाज आणि गोलंदाजांनी भारतीय खेळाडूंना घाम फोडला होता. मात्र दिपक चाहरने गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही बहुमुल्य योगदान देत ३ विकेट्सने थरारक विजय मिळवून दिला. त्याने आठव्या क्रमांकावर नाबाद ६९ धावा चोपल्या होत्या. तसेच भुवनेश्वर कुमारनेही त्याला नाबाद १९ धावा करत पुरेपुर साथ दिली होती. हा सामना जिंकत भारताने वनडे मालिकाही आपल्या नावावर केली होती.
तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात श्रीलंका संघ क्लिन स्वीपच्या नामुष्कीपासून वाचण्यासाठी उतरला होता. सलामीवीर अविष्का फर्नांडोच्या ७६ धावांच्या झुंजार खेळीमुळे श्रीलंकेने ३ विकेट्सने सामना जिंकला होता. भारतीय धुरंधर सूर्यकुमार यादवला वनडे मालिकेचा मालिकावीर निवडण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: लोकल भाषेत श्रीलंकन यष्टीरक्षकाचा गोलंदाजाला सल्ला; पुढच्याच चेंडूवर ‘अशी’ पडली संजूची विकेट
काय सांगता राव! ‘मालिकावीर’ पुरस्कार मिळूनही धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार आहे ‘या’ कारणामुळे नाराज
आधी किलर स्माईल अन् नंतर गगनचुंबी सिक्सर! संजू सॅमसनचा ‘हा’ व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल