चंदू बोर्डे हे नाव सर्व क्रिकेटप्रेमींना परिचित असेलच. भारताचे माजी क्रिकेटर आणि कर्णधार अशी त्यांची साधीसरळ ओळख. आज ते हयात नसतानाही त्यांचे नाव नेहमी आदरानेच घेतले जाते. आधी क्रिकेटर आणि नंतर क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांनी पाडलेली छाप भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णक्षरांनी लिहिलेली आहे. मात्र, याच चंदू बोर्डे यांना भारतातील अशा तीन व्यक्तींनी खांद्यावर उचलून घेतलं होतं, ज्यांची फॅन फॉलोईंग आणि कार्यकर्ते अक्षरशः करोडोंच्या घरात आहेत. मात्र कोण होते ते तीन व्यक्ती आणि नक्की अशी काय घटना घडली होती? याचा खुलासा करणारा हा व्हिडिओ.
चंद्रकांत गुलाबराव बोर्डे (Chandrakant Gulabrao Borde) असं त्यांचं पूर्ण नाव. एक महाराष्ट्रीयन ख्रिश्चन फॅमिली. गुलाबराव बोर्डे पोलीस कॉन्स्टेबल होते. एकूण दहा जणांचं कुटुंब. एक लहानशी खोली असल्याने बऱ्याचदा त्यांच्या अनेक रात्री रस्त्यावर त्यांना झोपाव लागलं. खरंतर परिस्थितीतून घडणं काय असतं हे चंदू बोर्डे यांनी अनुभवलं. 1950च्या दरम्यान क्रिकेट भारतात चांगलं फोफावलेलं. पुण्यातही मुंबईसारखेच अनेक नवे ताज्या दमाचे क्रिकेटर तयार होऊ लागले. त्यातील एक होते चंदू बोर्डे (Chandu Borde). सतराव्या वर्षी ते महाराष्ट्रासाठी रणजी खेळले. ऑलराऊंडर बोर्डे यांनी फिफ्टी आणि त्यानंतर फाईव्ह विकेट हॉल घेत चांगली सुरुवात केली. दोन वर्षातच त्यांना टीम इंडियात सहभागी केले गेले, पण दुर्दैवाने 1954च्या त्या पाकिस्तान टूरवर त्यांना डेब्यू करण्याची संधीच मिळाली नाही.
चंदू बोर्डे यांच्याकडे टॅलेंट होतं यात वादच नव्हता. ते आज ना उद्या भारतासाठी खेळणार हेही नक्की होतं, पण तो उद्या उजडायला 1958 साल लागलं. मधल्या काळात ते बडोद्यासाठी रणजी खेळू लागले. बडोदा महाराजांना त्यांच्या खेळ अत्यंत आवडायचा. ते ज्यांना गुरू मानायचे त्या विजय हजारेंचा इथे त्यांना भरपूर सहवास लाभला. तसं 1954मध्ये हे दोघेही एकदा मुंबईसाठी एकत्र खेळलेले, पण हजारे बोर्डे यांना गुरुस्थानीच होते.
तर 1958 ला खूंखार बॉलिंग अटॅक असलेली वेस्ट इंडिज भारतात आलेली. ब्रेबॉर्नवर पहिली टेस्ट सुरू झाली आणि चंदू बोर्डे यांना टीम इंडियाची कॅप मिळाली. ते इंटरनॅशनल क्रिकेटर झाले, पण ७ रन्सवर रनआऊट झाल्याने पदार्पण गाजवायच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. दुसऱ्या मॅचमध्ये डक आणि तेरा. तिसऱ्या मॅचमधून सरळ बाहेरचा रस्ता. खराब सुरुवातीनंतर स्वतः चंदू बोर्डेच अस्वस्थ होते. पुन्हा संधी मिळते का नाही याचं टेन्शन त्यांना आलेलं, पण सुदैवाने मद्रास येथील चौथ्या टेस्टला त्यांना पुन्हा इलेव्हनमध्ये संधी मिळाली. इथंही भोपळाच.
दुसऱ्या इनिंगमध्ये काही झालं तर ठीक! नाहीतर आता नारळ घ्यायचा हे त्यांना कळून चुकलेलं. त्यांनी आपला प्लॅन बदलला. त्यावेळी क्रूर मानल्या जाणाऱ्या रॉय गिलख्रिस्ट आणि वेस हॉल यांच्यावर काउंटर अटॅक करत त्यांनी फिफ्टी मारली. संघ मॅच हरला, पण बोर्डे यांची जागा कायम राहिली.
वेस्ट इंडीज सीरिज जिंकलेली. शेवटची दिल्ली टेस्ट औपचारिकच होती. त्या मॅचसाठी चांगली बॅटिंग विकेट मिळाली. नरी कॉन्ट्रॅक्टर 92, पॉली उम्रीगर 76 आणि हेमू अधिकारी यांनी 63 रन्स केल्या. मात्र, बोर्डे एक पाऊल पुढे गेले आणि त्यांनी चक्क शतक ठोकले. सोबर्स, हॉल, गिलख्रिस्ट, कोली स्मिथ यासारख्या धडकी भरवणाऱ्या बॉलर्सविरुद्ध शतक ही कल्पना त्यावेळी कोणी केली नव्हती. बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. 109 वर ते आऊट झाले. पव्हेलियनमध्ये येत असताना पाच-सहा उत्साही प्रेक्षक ग्राउंडमध्ये आले आणि त्यांना उचलून घेत ड्रेसिंग रूमपर्यंत गेले.
पुढे अनेक वर्षानंतर 2009 मध्ये माजी खेळाडूंचा एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). चंदू बोर्डे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होणार होता. त्या मधल्या काळात चंदू बोर्डे अमिताभ यांच्यापाशी गेले आणि त्यांना आपले नाव सांगितले. त्यावर अमिताभ यांनी अत्यंत सन्मानपूर्वक म्हटले,
“मी तुम्हाला ओळखतो?”
अमिताभ पुढे बोलताना म्हणाले,
“तुम्हाला आठवतं का तुम्ही दिल्लीत शतक ठोकलेलं?”
त्यावर बोर्डे यांनी होकार दिला. त्यावर अमिताभ म्हणाले,
“त्यानंतर खांद्यावर तुम्हाला लोकांनी बाहेर आणलेलेही आठवत असेल?”
बोर्डेंंनी हो म्हटलं. त्यावर अमिताभ यांनी सांगितले की,
“तुम्ही ज्या खांद्यांवर होता त्यापैकी एक खांदा माझा आणि एक खांदा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा होता.”
बोर्डे यांना विश्वास बसत नव्हता. ज्या दोन व्यक्तींनी पुढे जाऊन पूर्ण भारत आपलासा केला. कित्येक खांद्यांवर त्यांना उचललं गेलं, त्या दोन व्यक्तींनी आपल्याला खांद्यावर घेतलेले ही कल्पनाच विचाराच्या पलीकडची होती.
सन 1964 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईतच बोर्डे यांनी विजयादशमीच्या दिवशी एक अशक्यप्राय वाटणारा विजय टीम इंडियाला मिळवून दिला. नेहमीप्रमाणे चाहत्यांचा गराडा पडला. पुन्हा त्यांना उचलून घेण्यात आल. चाहत्यांच्या गर्दीत यावेळी त्यांना उचलून घेणाऱ्या खांद्यांपैकी एक खांदा होता शो मॅन आणि सुपरस्टार राज कपूर यांचा. देशात ज्या लोकांच्या फक्त नावाने गर्दी होते, ते लोक एका गर्दीचा भाग होऊन आपल्याला खांद्यावर उचलतात, हे फक्त चंदू बोर्डे यांच्या कर्तुत्वामुळेच शक्य होऊ शकलं.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विंडीजमध्ये 15 वर्षांनी जिंकली टेस्ट, आफ्रिकेत रचला इतिहास; तरीही द्रविडला का म्हणतात अपयशी कॅप्टन?
‘कॅप्टन’ विरुद्ध सिद्धू: अझहरूद्दीनमुळे नवज्योत पाजींनी अर्ध्यातच सोडलेला इंग्लंडचा दौरा, पण का?