भारतासाठी आजवर शेकडो क्रिकेटपटूंनी आपले कौशल्य दाखवले. काही खेळाडूंना देवत्व प्राप्त झाले तर काही विस्मृतीत गेले. काही असेही खेळाडू राहिले जे मोठ्या खेळाडूंसोबत खेळल्याने त्यांच्या कामगिरीचे म्हणावे तितके श्रेय अनेकदा मिळाले नाही. या अशा कायम लक्ष्मणाची भूमिका निभावणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणजे भारताचे माजी फलंदाज यशपाल शर्मा. आज यशपालजींचा जन्मदिवस
११ ऑगस्ट १९५४ रोजी यशपाल यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथे झाला. यशपाल जी मोठे होत असताना क्रिकेट भारतात चांगलेच प्रसिद्ध होत होते. इंग्रज गेले तरी त्यांनी भारतीयांना क्रिकेट दिले होते. ६० च्या दशकात चंदू बोर्डे, दिलीप सरदेसाई, नवाब पतौडी ही नावे घराघरात पोहोचली होती. याच खेळाडूंना आदर्श मानून यशपाल यांनी खेळायला सुरुवात केली.
१९७२ मध्ये यशपाल शर्मांनी जम्मू-काश्मीर स्कूलविरूद्ध पंजाबच्या स्कूलकरिता खेळताना २६० धावा काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोन वर्षांतच ते पंजाब रणजी संघात निवडले गेले. व्हिझी करंडक जिंकणाऱ्या उत्तर विभाग संघाचे देखील ते सदस्य होते. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्यांची पहिली मोठी खेळी, दक्षिण विभागाविरुद्ध चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना आणि व्यंकटराघवनच्या दक्षिण विभागाविरुद्ध उत्तर विभागाकडून दुलीप करंडक स्पर्धेत आली. त्या डावात त्यांनी १७३ धावा बनवल्या होत्या. पण त्यानंतरही त्यांची, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड झाली नाही.
पुढच्या वर्षी इराणी करंडक स्पर्धेत ९९ धावांवर धावबाद झाल्यानंतर शर्मां यांना पाकिस्तान विरुद्ध मालिकेसाठी राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले. या दौर्यामध्ये त्याने दोन एकदिवसीय सामने खेळले. १९७९ मध्ये विश्वचषक संघात देखील त्यांची वर्णी लागली. मात्र, स्पर्धेतील एकाही सामन्यात खेळण्याची संधी त्यांना मिळाली नाही. त्यानंतर, इंग्लंड दौऱ्यावर अनेक काउंटी क्लबविरुद्ध खेळताना त्यांनी ५८ च्या सरासरीने ८८४ धावा फटकावल्या.
इंग्लंडमधील फॉर्मच्या आधारावर त्यांची भारतीय कसोटी संघात निवड झाली. पहिल्याच कसोटीत ते दोन्ही डावात शून्यावर बाद झाले मात्र आपल्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावून मागील सामन्यातील अपयश धुवून काढले. पुढच्या सामन्यात देखील त्यांच्या बॅटमधून एक शानदार शतक आले असते, मात्र, सामना संपायला ३.४ षटके बाकी असताना खराब प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला होता. १९७९-८० च्या मोसमात त्यांनी भारतीय संघासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. इतर मोठे फलंदाज चांगली खेळी करत असताना यशपाल त्यांना साथ देण्याचे काम करत. यशपाल हे बचावात्मक खेळाडू असले तरी, वेळप्रसंगी चौकार-षटकार मारण्याची त्यांची क्षमता होती.
१९८०-८१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे त्यांना संघातून वगळण्यात आले. पुढील एक वर्षात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघात पुनरागमन केले. १९८२ चेन्नई कसोटीसाठी इंग्लंड विरुद्ध त्यांची निवड करण्यात आली. त्या सामन्यात त्यांनी १४० धावांची खेळी केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासमवेत पूर्ण दिवस फलंदाजी करत इंग्लंड गोलंदाजांना नाकीनऊ आणले.
१९८३ च्या वेस्टइंडीज दौऱ्यावर पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत, यशपाल यांनी मारलेला चेंडू माल्कम मार्शल यांच्या डोक्यावर आदळल्याने मार्शल यांना क्रिकेटमधून अवेळी निवृत्ती घ्यावी लागली होती.
यशपाल यांचा चांगला फार्म पाहता, १९८३ विश्वचषकात त्यांची निवड करण्यात आले. यशपाल यांनी त्या संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघासाठी अनेक अविस्मरणीय क्षण दिले. सलामीच्या सामन्यात यशपाल यांच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने गतविजेत्या वेस्ट इंडिजला हरवण्याचा पराक्रम केला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात देखील, त्यांनी, भारताकडून सर्वाधिक ६१ धावा फटकावल्या होत्या. २००५ मध्ये धोनीने मारलेला ‘हेलिकॉप्टर शॉट’ सर्वांनी प्रथम पाहिला. मात्र, यशपाल यांनी १९८३ विश्वचषकातील उपांत्य सामन्यात बॉब विलीस यांच्या गोलंदाजीवर सर्वप्रथम अशा प्रकारचा फटका मारला होता.
विश्वचषकानंतर, मायदेशी परतल्यावर पाकिस्तान विरुद्ध मालिकेत ते पूर्णपणे अपयशी ठरले. अमृतसर येथे वेस्ट इंडीजविरुद्ध उत्तर विभागाकडून खेळताना तीन दिवसांच्या सामन्यात त्यांनी व्हिव्ह रिचर्ड्स यांच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकले. परंतु, वेस्ट इंडीजविरुद्धच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपयशी ठरल्याने त्यांची कारकीर्दीची अक्षरशः संपल्यात जमा झाली. पुढच्याच वर्षी, इंग्लंडविरुद्धच्या चार एकदिवसीय सामन्यांसाठी त्यांची पुन्हा संघात निवड करण्यात आली. मात्र, तेथे ते फक्त एका सामन्यामध्ये दहापेक्षा जास्त धावा करू शकले.
१९८७-८८ मध्ये ते पंजाब सोडून हरियाणा संघात दाखल झाले. त्यानंतर, आणखी दोन वर्षे रेल्वे संघासाठी घालवली. १९९१-९२ मध्ये, वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी सलग दोन सामन्यात शतक झळकावून आपली उपयोगिता सिद्ध केली होती.
१९७८-१९८५ या काळात, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ३७ कसोटी व ४२ वनडे सामने खेळले. ज्यात अनुक्रमे, १,६०६ व ८८३ धावा त्यांच्या नावे जमा आहेत.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, ते काही काळासाठी पंच झाले. भारतीय राष्ट्रीय संघाचे निवडकर्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा