भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (दि. 17 मार्च) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 188 धावांत रोखले. मात्र, भारतीय संघाचे वरच्या फळीतील फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत. टी20 संघातील हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात अपयशी ठरला. पहिल्या चेंडूवर गोल्डन डक होत तो माघारी परतला. त्यामुळे आता त्याच्या वनडे क्रिकेटमधील खेळावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माफक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ईशान किशन, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांचे बळी भारताने 16 धावांवर गमावले. सूर्यकुमार मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर पायचित झाला.
टी20 क्रिकेटमध्ये सध्या सर्वोत्तम फलंदाज असलेला सूर्यकुमार वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरतोय. जानेवारी 2022 मध्ये वनडे पदार्पण केलेल्या सूर्यकुमारने पहिल्या सहा सामन्यात 2 अर्धशतके व 4 वेळा 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. त्यानंतर मात्र त्याचा फॉर्म वनडे क्रिकेटमध्ये चांगलाच गडबडला आहे.
पुढील 15 पैकी 10 सामन्यात तो 20 पेक्षा जास्त धावा काढू शकला नाही. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 34 राहिली. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने 21 सामन्यात 27.61 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता त्याला वनडे संघात किती संधी द्यायची असा प्रश्न देखील चाहते व समीक्षक विचारतायेत.
वनडे क्रिकेटमध्ये अजूनही अडखळत असलेला सूर्यकुमार टी20 क्रिकेटमध्ये मात्र सुसाट धावताना दिसतोय. त्याने आत्तापर्यंत 45 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 46.41 च्या सरासरीने व 180 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 1578 धावा कुटल्या आहेत. यात 3 शतकांचाही समावेश आहे. मागील बऱ्याच काळापासून तो टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान आहे.
(Suryakumar Yadav Again Failed In ODI Out On Golden Duck In Mumbai ODI Against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जिममुळे क्रिकेटपटूंच्या दुखापती वाढल्या”, भारतीय दिग्गजाने दाखवून दिली सत्य परिस्थिती
बॅटमधून फ्लॉप, पण यष्टीमागे सुपरस्टार! ऑस्ट्रेलियन कर्णधाराला बाद करण्यात राहुलचा सिंहाचा वाटा, पाहा Video